समीर वानखेडेंची अटक टळली
मुंबई: भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गोत्यात आलेले भारतीय महसूल सेवा अधिकारी समीर वानखेडे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यापूर्वीच्या सुनावणीवेळी न्यायालयाने समीर वानखेडे यांना २२ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. ही मुदत आज संपत असल्याने समीर वानखेडे यांच्या अटकेबाबत उच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आजच्या सुनावणीवेळीही न्यायालयाने समीर वानखेडे यांना ८ जूनपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देत मोठा दिलासा दिला. परंतु, आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने समीर वानखेडे यांना काही अटी घातल्या
समीर वानखेडे यांनी संबंधित प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड करु नये. प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही, सीबीआयच्या तपासात हस्तक्षेप करणार नाही आणि सीबीआय अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर राहीन, अशी लेखी हमी संध्याकाळपर्यंत देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या सुटीकालीन खंडपीठाने दिले आहेत.
समीर वनाखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर छापा मारला होता. या कारवाईत अभिनेत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, समीर वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.