‘सांगली’त काँग्रेसमध्ये फूट; विशाल पाटील बंडाच्या पवित्र्यात!

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे पक्षाने लावलेल्या रेट्यापुढे काँग्रेसने सपशेल शरणागती पत्करली. महाविकास आघाडीची अधिकृत उमेदवारी चंद्रहार पाटील यांना जाहीर करत सांगलीत ‘विशाल नाही मशाल’, असा स्पष्ट संदेश दिला. त्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये संताप उसळला असून, कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. २०१९ नंतर पुन्हा एकदा काँग्रेसने दरवाजा बंद केल्याने आता विशाल पाटील बंडाच्या पवित्र्यात आहेत. या निर्णयावर आमदार विश्‍वजित कदम यांच्याशी चर्चा करून ते निर्णय घेतील, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या काल मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मुंबईत ११ मार्चला ठाकरे गटात प्रवेश केलेल्या चंद्रहार यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ मार्च रोजी मिरजेत येऊन शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली होती. ठाकरे यांची ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडीची नव्हे, असा दावा करत काँग्रेस आक्रमक झाली होती.

आमदार विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वात आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील यांनी प्रदेश आणि राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही सांगली काँग्रेसलाच हवी, अशी आग्रही भूमिका घेत ठाकरेंशी चर्चा सुरू ठेवली. प्रत्येक वेळी ठाकरेंनी ती धुडकावून लावली. अखेर शिवसेनेच्या हट्टापुढे आणि रेट्यापुढे काँग्रेस नेत्यांना नमते घ्यावे लागले. सांगलीत शिवसेनेच्या तुलनेत कैक पटीने ताकद असलेल्या काँग्रेसला जागा सोडवून घेण्यात प्रदेश काँग्रेसचे नेते सपशेल अपयशी ठरले. राष्ट्रीय नेतृत्वदेखील ठाकरेंच्या दबावापुढे नमले. अखेर आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना ‘सांगली’चा उल्लेख जाणीवपूर्वक दोन वेळा केला.

Share

Leave a Reply