सांगवीतील संजय शितोळे यांची लंडन ते पॅरीस 24 तासात सायकलवारी

पिंपरी – सांगवी मधील संजय शितोळे यांनी लंडन ते पॅरीस हे 330 किलोमीटरचे अंतर अवघ्या 24 तासात सायकलवरून पार केले. रस्त्यात लागलेला खडतर मार्ग, अधिकाऱ्यांसोबतचा वाद, पाउस अशा अडचणींवर मात करत त्यांनी हे अंतर पार केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तापमान किमान पाच अंश सेल्सिअस तर कमाल 19 अंश सेल्सिअस. 30 एप्रिल, दुपारी तीन वाजता संजय शितोळे यांनी ब्रिटीश आणि जर्मन सहकाऱ्यांसोबत लंडन येथून पॅरीसच्या दिशेने कूच केली.

लंडन ते ग्रीनविच, केंट, शडाऊन, फॉरेस्ट, समेक्स, काउंटी मधील चढ-उतार, दऱ्या, हिरव्यागार वृक्षांनी नटलेले रस्ते आणि परिसर; हे सगळं दिसायला लोभस असलं तरी सायकल प्रवास करणाऱ्यांचा घाम काढणारे होते. न्यू हेवन येथून इंग्लिश खाडी फेरी बोटीने पार करायला त्यांना पाच तास लागले. फ्रान्स मधील डीपी बंदरावर इंग्रजी न समजणाऱ्या फ्रेंच इमिग्रेशन अधिकाऱ्यांसोबत संजय शितोळे यांचा वाद झाला. त्यात त्यांचा अर्धा तास वाया गेला.

महायुद्धातील अनेक थरारक प्रसंगाचे साक्षीदार असलेल्या सोमे व्हॅली, नॉर्मडी या निसर्गरम्य भूमीतून जातानाही त्यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागली. पॅरीसच्या उपनगरातून आयफेल टॉवरचे टोक दिसताच त्यांना प्रचंड आनंद झाला. सन 1940 मध्ये फ्रान्स जिंकल्यानंतर जर्मन सैन्याला जेवढा आनंद झाला नसेल त्याहून कैक पटीने अधिक आनंद आपल्याला झाला असल्याचे संजय शितोळे-देशमुख सांगतात.

शेवटच्या दोन तासात त्यांना पावसाने चांगलेच झोडपले. अखेरच्या 45 मिनिटांमध्ये आणि 10 किलोमीटर अंतर पार करायचे होते. प्रयत्नपूर्वक त्यांनी हेही अंतर पार करून आयफेल टॉवर गाठला.

संजय शितोळे-देशमुख हे लंडन मधील अनेक संस्थांशी संबंधित आहेत. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र, युरोप मधील अनेक शिखरे सर केली आहेत. आंतरराष्ट्रीय मोहिमांमध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून ते योगाचा देखील अभ्यास करत आहेत.

Share

Leave a Reply