*साहेब तुम्हीच आमचे नेते, निवृत्तीचा निर्णय मागे घ्या – प्रा. कविता आल्हाट*पिंपरी – राजकारणात तब्बल 63 वर्ष काम करणारे, राजकारण आणि समाजकारणाचे चालते फिरते विद्यापीठ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आमचे राजकीय क्षेत्रातील काम त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय होऊ शकत नाही अशा भावना पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर व्यक्त केल्या. साहेबांनी त्यांचा निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा असे देखील आल्हाट यांनी म्हटले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. “लोक माझे सांगाती ” या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात संबोधित करताना शरद पवार यांनी ही घोषणा केली.या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याचे तीव्र पडतात राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. या घोषणाचे तीव्र पडसाद पिंपरी चिंचवड शहरात देखील उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निवृत्तीच्या घोषणेला कडाडून विरोध केला आहे. शहराच्या महिला अध्यक्षा आल्हाट म्हणाल्या, शरद पवार साहेब यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय आम्ही राजकीय जीवनात काम करू शकलो नसतो. महिला आरक्षणासाठी त्यांनी ज्या काही तरतुदी करून ठेवल्या. त्या तरतुदींमुळेच आज अनेक महिला भक्कमपणे राजकारणात काम करत आहेत. साहेबांनी घेतलेला निर्णय कदाचित त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी म्हणून हा निर्णय कोणालाही मान्य नाही. किंबहुना कार्यकर्ते या निर्णयाचा विचार देखील करू शकत नाही. त्यामुळे पवार साहेबांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. पुढील काळात त्यांची भक्कम साथ राजकीय दृष्टीने सर्वांनाच हवी आहे. त्यांच्याशिवाय पुढील मार्गक्रमण करणे अतिशय खडतर आहे असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत आहे. असे देखील आल्हाट यांनी नमूद केले.