पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागातर्फे 2023-24 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची बिले 350 महिलांच्या मार्फत वाटप सुरू आहे. अवघ्या 12 दिवसात महिलांनी तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त मालमत्ता करांच्या बिलांचे वितरण केले आहे. तसेच महापालिकेने तयार केलेल्या ऍप्लिकेशनद्वारे मालमत्ता धारकांचा पर्यायी पत्ता, मोबाईल क्रमांक अपडेटही करण्यात येत असून ‘सिध्दी प्रकल्प’ यशस्वी होताना दिसत आहे.
शहरात पाच लाख 97 हजार 785 मालमत्ता आहेत. कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत प्रथमच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटाच्या 390 महिलांना मालमत्ता कराची बिले वाटपाचे कामकाज देण्यात आले आहे. महिलांना रोजगार आणि त्यांची आर्थिक उन्नतीही होत आहे. बचत गटांतील महिलांना हे काम दिल्यामुळे महिलाही मोठ्या उत्साहाने हे काम करत आहेत. या प्रकल्पात सहभागी असलेल्या महिला त्या-त्या भागातील आहेत. अवघ्या 12 दिवसात तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त मालमत्ता बिलांचे म्हणजे बिले वाटपांचे 30 टक्के कामकाज पूर्ण झाले आहे. महिलांना दिलेले काम हे फक्त बिले वाटपाचे नव्हते तर यामध्ये महिलांना मालमत्ता धारकांची अद्यावत माहिती संकलित करण्याचे कामही देण्यात आले आहे.
करसंकलन विभागाच्या ऍप्लिकेशनद्वारे मालमत्तेचे अक्षांश व रेखांशची माहिती घेतली जात असून प्रत्येक मालमत्तेचा फोटो घेतला जात असून जिओ टॅग केले आहेत. मालमत्ता जिओ टॅग झाली असल्यामुळे संबंधित मालमत्ता शोधण्यासाठी भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. ऍप्लिकेशनद्वारे महिला मालमत्ता धारकांचा चुकीचा मोबाईल क्रमांक दुरूस्त करणे, नवीन मोबाईल क्रमांक अपडेट केले जात आहे. यापैकी आत्तापर्यंत पन्नास हजारांवर मोबाईल क्रमांक दुरूस्त केले असून दहा हजार मालमत्तांचे पर्यायी मोबाईल क्रमांक पर्यायी आले आहेत. त्याचबरोबर बिलांवर मालमत्ता धारकांच्या जुन्या पत्त्यांमध्ये दुरूस्ती करण्यास महिलांना सांगितले आहे.
त्यानुसार सत्तर हजार मालमत्ताधारकांच्या पत्यांमध्ये दुरूस्ती केली आहे. तर अनेक मालमत्ता धारक संबंधित मालमत्तेच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे त्यांचाही पर्यायी पत्ताही घेतला जात असून दहा हजार मालमत्ता धारकांचे पर्यायी पत्ते घेऊन अपडेट करण्यात आले आहेत. तीन हजारावर मालमत्ता आढळून आल्या नाहीत. या न सापडलेल्या मालमत्ता दुबार असणे, अस्तित्वात नसणे, भूसंपादन झालेल्या असणे शक्य आहेत. कर संकलन विभागाकडून अशी फुगीर मागणी कमी करण्याचे काम वर्षभरात केले जाणार आहे.
मालमत्तेच्या सर्व माहितीचे अद्यावतीकरण
महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ता धारकांना दरवर्षी बिले देण्यात येत असतात. मात्र, अपुऱ्या पत्यांमुळे अनेक मालमत्ता धारकांना बिले मिळण्यास अडचण येत असते. तसेच कर संकलनच्या सर्व सेवा-सुविधा ऑनलाइन झाल्या असताना मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याने मालमत्ता धारकांना ऑनलाइन सुविधांचा लाभ घेण्यात अडचणी येत आहेत. याचाच विचार कर संकलन विभागाने मालमत्ता धारकांच्या सर्व माहितीचे ऍप्लिकेशनद्वारे संकलन व अद्यावती करण्याचे काम सिध्दी प्रकल्पाअंतर्गत हाती घेतले आहे. त्यामुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि माहितीचे अद्यावतीकरणाचा हा ‘सिध्दी प्रकल्प’ यशस्वी ठरला असून अद्यावत माहितीचा पालिकेला कायमस्वरूपी लाभ होणार आहे. तसेच सर्व मालमत्ता धारकांना घर बसल्या कर संकलनच्या सर्व सेवांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
‘सिद्धी प्रकल्प’ हा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. महिला सक्षमीकरण व कर संकलन विभागाच्या माहितीचे शुद्धीकरण अशी दोन महत्त्वाची उद्दिष्टे ठेवून हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. आजमितीस ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होताना दिसत आहेत. स्थानिक महिलांना बिले वाटपाचे काम दिले आहे. यातून त्यांना शहराच्या स्थानिक भागाची सखोल माहिती होत आहे. याचा भविष्यात विविध योजनांसाठी कसा उपयोग करून घेता येईल यावर आमचे काम चालू आहे. यातून सिद्धी प्रकल्प नवीन उंचीवर नेण्यात येईल, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.