सुमीत राघवन यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान प्रदान

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलारंग महोत्सवात निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी सुमीत राघवन यांना प्रदान करण्यात आला. अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते सदर सन्मान राघवन यांना प्रदान करण्यात आला. या सन्मानाचे हे सलग दुसरे वर्ष असून रोख रुपये 21 हजार, उपरणे, गांधी टोपी आणि रोप असे या सन्मानाचे स्वरूप होते.

हा कार्यक्रम कोथरूड पुणे येथे पार पडला कार्यक्रमावेळी बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष समीर बेलवलकर, निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले- थत्ते, राजेश दामले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राघवन म्हणाले की, लोककला टिकवायची असेल तर लोककलाकार आणि आजचे व्यावसायिक नट यांना एकत्र घेत लोकनाट्ये व्हावीत. आज प्रेक्षकांना जिवंत कला पाहण्याची नशा आहे, त्यामुळे नाटक पाहणारे प्रेक्षक हे चित्रपटाला जाणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा अधिक असतात असे मला वाटते असे सांगत सचिन खेडेकर म्हणाले, “आज कलाकाराने प्रेक्षकाभिमुख काम करायला हवे. प्रत्येक चांगल्या कलाकृतीला रसिक प्रेक्षक हे न्याय देतातच यावर माझा विश्वास आहे. कलाकाराने कलाकार म्हणून मेहनत घ्यायला हवीच शिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून सामाजिक भान जपण्यावरही भर द्यायला हवा. कलाकारापेक्षा चांगला माणूस बनण्यावर त्याला जादा मेहनत घ्यावी लागते हेही लक्षात घायला हवे.”

मराठी चित्रपटांवर नटाचे पोट भागू शकत नाही त्यामुळे त्यांना बाहेर पडून ओटीटी आणि मालिका कराव्याच लागतील याकडे राघवन यांनी लक्ष वेधले. प्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार राजेश दामले यांच्या संकल्पनेतून साकारात असलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘एका पावसात’ या विशेष कार्यक्रमाने झाली. यामध्ये गार्गी फुले थत्ते आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांचा कवितांचा कार्यक्रम संपन्न झाला. तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात राजेश दामले यांनी सुमीत राघवन यांची मुलाखत घेतली. समीर बेलवलकर यांनी प्रास्ताविक केले, राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर सिद्धी कुलकर्णी यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply