पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
विधानसभेच्या येत्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविला होता. त्या अंतर्गत पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यांची प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने 6 ऑगस्टला प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार शहरात 15 लाख 63 हजार 647 मतदार संख्या झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदार संघनिहाय नेमलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांना पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ विधानसभा मतदार संघातील अधिकारी या प्रशिक्षणास उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य निवडणूक विभागाने हे प्रशिक्षण सत्र घेतले. पुणे आणि कोकण विभागातील विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांना तेथे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवसांचा होता. निवडणूक पूर्व तयारी, ईव्हीएमची चाचणी, प्रचार यंत्रणा, आचारसंहितेचे पालन, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देणे, मतदार केंद्रांची तयारी, मतदानाच्या दिवशीचे कामकाज, स्ट्राँग रूम, मतमोजणी आदी निवडणुकीसंदर्भातील सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अधिका-यांना उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.
दरम्यान, ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.
विधानसभा मतदार संघानुसार मतदार
पिंपरी – 3 लाख 77 हजार 251
चिंचवड – 6 लाख 27 हजार 437
भोसरी – 5 लाख 58 हजार 959