विश्वगुरुत्व वैभवात नाही तर विचारात : ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले
पुणे : भौतिक समृद्धी म्हणजे वैभव नाही. विश्वगुरुत्व वैभवात नाही तर विचारात असते, असे प्रतिपादन माणकोजी महाराज यांचे वंशज ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांनी केले. संतांचे वाङ्मय विशाल मानवतेचे आहे, विदर्भ-मराठवाड्यातील भूमीवर संत विचारांचा जागर होत आला आहे, परंतु त्या विचारांच्या चाकोरीत येत नाहीत अशाच व्यक्ती आत्महत्या करतात. संत वाङ्मयाच्या वातावरणात गेल्यानंतरच त्याचा आविष्कार दिसून येईल, अशी टिप्पणी त्यांनी केली.
वारकरी संप्रदायातील समता, बंधुता व मानवता या मूल्यांना केंद्रस्थानी मानून कार्यरत असलेल्या बंधू-भगिनींना संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे व वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा संत चोखामेळा समता पुरस्कार मंगळवेढा येथील प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांना आज (दि. 17) बोधले महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. उपरणे, मानपत्र, श्रीफळ आणि पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. संत चोखामेळा यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणाऱ्या ज्येष्ठ प्रवचनकार व कीर्तनकार ह. भ. प. सुभद्रामाय खरात यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला. त्या वेळी बोधले महाराज बोलत होते. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर, श्री संत तुकाराम महाराज देहू संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज, संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माणिक सोनवणे होते.
बोधले महाराज पुढे म्हणाले, भोगवादाच्या चिखलात अडकलेली माणसे जग्तगुरूंच्या विचारांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. भौतिक सुखातून विश्वगुरुत्वाला पोहोचता येत नाही. कृष्णंवंदे जगत्गुरू, जगत्गुरू शंकराचार्य, जगत्गुरू संत तुकाराम महाराज हे पूर्वीच विश्वगुरू झालेले आहेत.
ह. भ. प. शिवाजीराव मोरे महाराज देहूकर म्हणाले, संत चोखोबा महाराज यांचे विचार जनसामन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. समाजात, घराघरात सुसंवाद नाही, संस्कारहीन पिढी निर्माण होत आहे हे लक्षात घेऊन संत विचारातून आपण पुढील पिढीला घडविले तर देशही घडेल. समतेच्या वारीचा विचार देशात पोहोचला तर सामाजिक समरसता निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ह. भ. प. माणिकबुवा मोरे महाराज म्हणाले, समता हा शब्द जनमानसात रूढही नव्हता त्या काळात संत चोखोबा यांनी समतेचे बीज अभंगांच्या माध्यमातून रुजविले. चोखोबा यांच्या हृदयात मानवेतविषयी कळवळा होता, त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी खूप मोठे कार्य केले आहे. तुकोबांनी परमार्थाची सुरुवात चोखोबांच्या विचारांना बरोबर घेऊन केली.
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी म्हणाले, माझ्या विचारांची धाटणी संशोधकाची असल्याने त्या नजरेने मी चोखोबांच्या साहित्याकडे पाहिले. आयुष्यात झालेल्या मोठ्या आघातामुळे माझी चोखाबांच्या विचारांशी भेट झाली. चोखोबा यांचे गुरू संत नामदेव आणि चोखोबा यांचे देह वेगवेगळे असले तरी मने एकरूप होती. गुरूने शिष्याचे चरित्र लिहावे असा संत म्हणजे संत चोखामेळा होय.
प्रास्ताविक सचिन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले तर आभार प्रा. भाऊराव खुणे यांनी मानले. स्वागत सचिन पाटील, भाऊराव खुणे, धम्मपाल अडसूळ, भीमराव चाटे, वल्लभ केनवडेकर यांनी केले.