चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1, मोरेवस्ती चिखली येथील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा, ड्रेनेज लाईन व आरोग्यविषयक समस्या गेल्या अनेक वर्षांपासून सुटत नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे आता ‘कर का भरावा?’ असा थेट सवाल स्वराज्य पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाला विचारण्यात आला आहे.
स्वराज्य पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जरे यांनी या संदर्भात महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनात त्यांनी नमूद केले की, “मुलभूत नागरी सुविधांबाबत नागरिक वारंवार तक्रारी करतात, परंतु प्रशासन केवळ ठेकेदारांना पोसत आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून कर वसुली करणे हा अन्याय आहे. जर नागरिकांना आवश्यक सेवा देऊ शकत नसाल, तर कर वसुली थांबवून या भागातील कर माफ करण्यात याव्या. तसेच, आयुक्त साहेबांना याबाबत पत्र पाठवून स्थायी स्वरूपात करमाफी जाहीर करावी, अशी मागणी जरे यांनी केली आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाने प्रशासनाचा हलगर्जी कारभार व नागरिकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले आहे. या मागणीनंतर आता प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
