वारकऱ्यांचा सन्मान, योग व भक्तीचा सुंदर संगम
भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे लांडेवाडी, भोसरी येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘भक्तीयोग २०२५’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा उपक्रम २१ जून २०२५ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत विश्रांतवाडी, टिंगरेनगर येथील श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अधिकृत दिंडी – चातुर्मुख महादेव संस्थान (क्रमांक ३०२) – श्री. खेसे पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात २७० वारकरी सहभागी झाले होते. महाविद्यालयातर्फे सर्व वारकरी बंधू-भगिनींचा टोपी, उपरणे व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश चव्हाण यांनी विविध योगासने, प्राणायाम व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक सादर केले. योग व भक्तीचा सुरेख संगम घडवत त्यांनी उपस्थितांना आरोग्यदायी जीवनाची प्रेरणा दिली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष व विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवून सर्व वारकऱ्यांना आयुष्यात भक्ती आणि योगाचा समतोल ठेवत आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा संदेश दिला.
या उपक्रमाचे नियोजन डॉ. सुग्रीव आडाल (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) आणि प्रा. अनिल गंभीरे (विद्यार्थी विकास अधिकारी) यांनी केले. कार्यक्रमात प्रा. माधुरी चौधरी, प्रा. पूनम पाटील, श्री. आकाश साळी आणि NSS स्वयंसेवक यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
