चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
हिरा सामाजिक शिक्षण संस्था संचालित सिद्धिविनायक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेला प्रवेश उत्सव अक्षरशः रंगतदार आणि उत्साहपूर्ण ठरला. पहिल्याच दिवशी शाळेच्या परिसरात आनंद, उत्सुकता आणि उमेदेचे वातावरण भरभरून दिसून आले.
शाळेच्या प्रवेशद्वारापासूनच सजावट लक्ष वेधून घेत होती. रंगीबेरंगी फुगे, फुलांची आरास आणि आकर्षक रांगोळ्यांनी परिसर सुसज्ज झाला होता. वर्गखोल्यांची केलेली सजावट, विद्यार्थ्यांचे औक्षण आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आलेले स्वागत यामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.
या उत्साहपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा निर्मला जाधव, सचिव मारुती जाधव, नंदा वायचळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या लेझीम पथकाने ढोल-ताशाच्या गजरात सादर केलेले लेझीम नृत्य विशेष आकर्षण ठरले. या जल्लोषपूर्ण स्वागतामुळे विद्यार्थी आणि पालक अक्षरशः भारावून गेले.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात आले, तसेच खाऊ आणि नविन गणवेश व पुस्तके वाटप करून शैक्षणिक वाटचालीस गोड सुरुवात झाली. यानंतर अध्यक्षा निर्मला जाधव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले व शाळेच्या यशाचा आलेख चढता राहावा, असे शुभेच्छा दिल्या.
प्रवेशाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. उत्साही स्वागत, कलात्मक सादरीकरणे, आणि मनपूर्वक नियोजन यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेच्या वाटचालीतील पहिला पाऊल आठवणीत राहणारा ठरला.
