जिथं विद्यापीठ नाही, तिथं जीवन विद्येचं ः गिरीश प्रभुणेंचा संदेश

तळेगाव दाभाडे ः टीम न्यू महाराष्ट्र

तळेगाव दाभाडे येथे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात भारतातील भटके-विमुक्त समाजाचं अनुभवसिद्ध ज्ञानसंपन्न रूप उलगडलं. “या समाजात उपनिषदांसारखं गूढ, सखोल आणि जीवनाशी थेट नातं सांगणारं ज्ञान आहे. त्यांच्या भाषेत, परंपरांमध्ये, श्रमकौशल्यात आपल्याला एका वेगळ्याच भारताचं दर्शन घडतं,” असं प्रभुणे यांनी ठामपणे सांगितलं.

तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश मोफत वाचनालय व ग्रंथालय यांच्या वतीने आयोजित समारंभात प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी गौरव करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दिवेकर यांनी त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक प्रवासाची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

‘असीधारा’ या साप्ताहिकापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास ‘ग्रामायन’ विशेषांकापर्यंत आणि तिथून युनेस्कोपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांनी गावकुसाबाहेर राहून समाजाचं वास्तव अनुभवलं. अस्पृश्यतेच्या वेदना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आणि संघाच्या प्रचारक असतानाही ‘माणूस’ केंद्रस्थानी ठेवणारी भूमिका त्यांनी अंगीकारली.

१९९३ ते २००४ या काळात फासेपारधी, नंदीबैलवाले, गोंधळी अशा समाजांसोबत प्रत्यक्ष काम करत त्यांनी “प्रथम वसन – मग पुनर्वसन” ही भूमिका जिवंत केली. यमगरवाडी वसतिगृह आणि पुढे ‘समरसता गुरुकुलम्’ या उपक्रमांतून त्यांनी भटक्या-विमुक्तांच्या अनुभवाधारित ज्ञानाला शिक्षणाच्या प्रवाहात आणलं.

प्रभुणेंना मेकॉले शिक्षणपद्धतीवर ठाम टीका आहे. “या शिक्षणानं सरस्वती हरवली,” असं ते सांगतात. त्यांच्या मते, भारताला समजून घ्यायचं असेल, तर या समाजांकडे वळायला हवं – जेथे विज्ञान, कला आणि जीवनाचं तत्त्वज्ञान रानात वावरताना गवसतं.

हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा गौरव नव्हता, तर एका विचारपद्धतीचा, एका समाजाच्या आत्मसन्मानाचा आवाज होता.

Leave a Reply