बारामती ः टीम न्यू महाराष्ट्र
“पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर त्या महिलांच्या सक्षमीकरणाचा सर्वोत्तम आदर्श होत्या. त्यांनी आपल्या काळात जे कार्य केले, ते आजच्या महिला आणि नवयुवतींसाठी प्रकाशवाटा दाखवणारे आहे. महि लांनी केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता समाज, शासन व कायद्याच्या क्षेत्रातही पुढे येणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधीज्ञ ॲड. सुप्रिया बर्गे यांनी केले.
छत्रपती साखर कारखाना मैदान, भवानीनगर येथे अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘अहिल्यारत्न’ व ‘समाजरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या प्रसंगी ॲड. सुप्रिया बर्गे यांना ‘अहिल्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या सोबतच UPSC यशस्वी उमेदवार योगेश बोरकर, महसूल सहायक निर्मला घुले, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, चार्टर्ड अकाऊंटंट अनिकेत सुळ आदींचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात महिलांसाठी पारंपरिक खेळ, हळदीकुंकू समारंभ, गजी नृत्य, आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर बुरुंगले व कुमार देवकाते यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. सुजित वाघमोडे यांनी केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार ॲड. रामहरी रुपनवर यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे आदर्श कार्य उलगडून सांगितले. “१८व्या शतकातील या जगप्रसिद्ध प्रशासिकेने अठरापगड जातींना न्याय दिला. २८ वर्षे त्यांनी राज्यकारभार सांभाळून जनतेच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले,” असे ते म्हणाले.
