कै. द्वारका तापकीर यांच्या पुण्यस्मरणात भक्ती, कीर्तन, रक्तदान आणि अन्नदानाचा महायज्ञ

भोसरी ः टीम न्यू महाराष्ट्र

चऱ्होली येथील द्वारका स्केअर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक देविदास तापकीर यांच्या मातोश्री कै. द्वारका तापकीर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा, कीर्तन महोत्सव आणि रक्तदान शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात तब्बल २२० दात्यांनी रक्तदान करत समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

कै. द्वारका तापकीर या अत्यंत कष्टाळू, धार्मिक आणि कुटुंबप्रेमी स्त्री होत्या. त्यांच्या आयुष्यभराच्या संस्कारशील जीवनशैली, श्रद्धा आणि सेवा परंपरेचा आदर्श लक्षात ठेवत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. समाजात सद्गुणांची आणि सेवाभावाची पेरणी करणाऱ्या त्यांच्या आठवणी जपण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे देविदास तापकीर यांनी सांगितले.

दि. ७ जुलै ते १३ जुलै या कालावधीत चऱ्होली येथील द्वारका स्केअर येथे हा महोत्सव पार पडला. समारोप दिनी डाॅ. श्रीगुरु जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. पं. अतुलशास्त्री भगरे यांनी श्रीमद भागवत कथा सादर केली, ज्याचे अनेक भाविकांनी श्रवण केले.

या सात दिवसांच्या महोत्सवात भाविकांसाठी नित्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला आमदार महेश लांडगे यांचे वडील वस्ताद किसनराव लांडगे, माजी महापौर नितिन काळजे, संजोग वाघेरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, पवना बँकेचे संचालक बिपिन नाणेकर, दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापुसाहेब ढेरे, पोलिस पाटील पंडित तापकीर, युवा नेते कुणाल तापकीर, प्रदीप तापकीर, विजय रसाळ, धनंजय तापकीर यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

महोत्सवाचे यशस्वी आयोजन देविदास तापकीर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनतीने केले. महेश तापकीर यांनी समारंभाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply