पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
आपले विचार चांगले असतील, आचरणात प्रामाणिकपणा असेल तर केलेल्या कृतीमुळे अंतर्मनातून आनंद मिळतो. मत्सर, मोह दूर लोटून अनावश्यक स्पर्धेतून बाहेर पडले की वर्तणूक सकारात्मक होते. अशा सकारात्मक कृतीतून व आचरणातून प्रत्येकाचे जीवन आनंदी राहते. हीच राष्ट्रहित आणि विश्वशांतीची पायाभरणी आहे असे मत निवेदिता धावडे यांनी व्यक्त केले.
चिंचवड गावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ या संस्थेच्या वतीने सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाअंतर्गत जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे चौथीसावे वर्ष आहे. यातील दुसरे पुष्प गुंफताना निवेदिता धावडे यांनी “प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची” या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मरळ, हभप किसन महाराज चौधरी, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, व्याख्यानमाला समितीचे समन्वयक सुहास पोफळे, मंगल नेवाळे, अतुल आचार्य, चंद्रकला शेडगे, शैलेश जोशी, प्रा. तुकाराम पाटील, डॉ. धनंजय भिसे, राज अहिरराव, राजेंद्र घावटे, भगवान पठारे, जयंत सोले, शशांक सोले आदींसह गांधी पेठ महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
यावेळी निवेदिता धावडे म्हणाल्या की, ज्या व्यक्ती अंतर्मनातून अपूर्ण असतात त्यांना बाह्य गोष्टींची गरज भासते. जे अंतर्मनातून पूर्ण असतात त्यांना बाह्य गोष्टींची गरज भासत नाही. आपल्यासोबत इतरांचेही भले होऊ दे ही बोलणारी कृती ही राष्ट्र व विश्वहितासाठी आवश्यक असते. आनंद वाटला की, त्याच्या बदल्यात तुम्हालाही आनंद मिळेल. मुखवटा घालून मिरवू नका जसे आहात तसेच राहा. दिखाव्यात जगू नका, आनंदी राहा अशा कृतीतून राष्ट्र आणि विश्व आनंदी होईल आणि आनंदाचा निर्देशांक वाढून राष्ट्रहित साध्य होईल. मोबाईल सारखी कोणतीही निर्जीव वस्तू माणसाला बिघडवत नसते. त्याचा वापर करताना विवेक बुद्धीचा वापर करावा. एखादा नकारात्मक संदेश पुढे पाठवू नये. राष्ट्राचा एक सुज्ञ नागरिक म्हणून तो पुढे न पाठवता थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी असेही आवाहन धावडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब मरळ म्हणाले की ,एकत्रित कार्य केल्यास समाज परिवार वाढवता येतो. स्वागत हेमा सायकर, आभार राजाभाऊ गोलांडे यांनी मानले