पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदारांच्या सोयीसाठी 1 ते 13 मे 2024 कालावधीत ‘नो युवर पोलिंग स्टेशन’ (मतदान केंद्राविषयी जाणून घ्या) कक्ष सुविधेद्वारे मतदान केंद्राची माहिती देण्यात येणार आहे. या सुविधेचा शहरातील अधिकाधिक मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
‘मतदान केंद्राविषयी जाणून घ्या’, या कक्षासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात सुचेता पानसरे (‘अ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी प्राधिकरण), अमर पंडित (‘ब’ क्षेत्रीय कार्यालय, चिंचवड), अण्णा बोदडे (‘क’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी), अंकुश जाधव (‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, रहाटणी), राजेश आगळे (‘ई’ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी), सीताराम बहुरे (‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, निगडी), अजिंक्य येळे (‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव) आणि उमेश ढाकणे (‘ह’ क्षेत्रीय कार्यालय, कासारवाडी) यांचा समावेश आहे.
13 मे रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढविण्याच्या अनुषंगाने हे कक्ष एक मेपासून कार्यान्वित होणार असून, सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील. त्यांद्वारे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा व येत्या मतदानाच्या वेळी अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.