पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आणि ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्र पवार साहेब व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निश्चय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांच्या बैठका शुक्रवारी (दि.12) घेण्यात आल्या. दापोडी, महेशनगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी आणि किवळे येथील मुकाई चौक या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. बैठकीस महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.
महाविकास आघाडी बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रचारात सामील व्हावे. भाजपने दिलेली खोटी आणि फसवी आश्वासने तसेच, वाढलेली महागाई, बेरोजगारी आदींबाबत नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून माहिती पोहचवा. विरोधकांना ईडी, सीबीआयच्या दबाव तंत्राचा वापर करून भाजप आपली आसूरी ताकद वाढवत आहे. संविधान बदलण्यासाठी लोकशाहीचा अक्षरशः हत्या करून नवीन कायदे लादण्याचे काम सुरू आहे. या गोष्टी घराघरात पोहचवा, असे मार्गदर्शन प्रमुख पदाधिकार्यांनी केले.
कोरोनाच्या संकट काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यावर आलेले संकट सक्षमपणे पेलले. त्यांनी अनेकांचे जीव वाचविले. राज्यभरात तातडीने कोविड रूग्णालय सुरू करून उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. कुटुंबप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे जागातिक पातळीवर कौतुक झाले. महाविकास आघाडीने केलेल्या कामाची माहिती नागरिकांन पर्यंत पोहचवा अश्या सूचना पदाधिकार्यांनी या वेळी दिल्या.
दरम्यान, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला सारून एक दिलाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे काम करण्याची ग्वाही यावेळी दिली.