-भोसरीतील विराट सभा परिवर्तनाचे प्रतीक- अजित गव्हाणे
-कारखानदारीची वाढ, रोजगार , महिलांच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी वाढविला ‘युथ कनेक्ट’ – अजित गव्हाणे
-भोसरीतील सभेनंतर शरद पवारांनी मतदारांचा विश्वास वाढवला – अजित गव्हाणे
-भोसरीतील भ्रष्टाचार, दडपशाही विरुद्ध पवारांनी पुढे केला विकासाचा मुद्दा – अजित गव्हाणे
-भोसरीच्या सभेतील विराट गर्दी परिवर्तनात बदलणार- अजित गव्हाणे
भोसरी 14 नोव्हेंबर ::
भोसरीतील निवडणूक भ्रष्टाचार ,दडपशाही विरुद्ध परिवर्तन अशी रंगलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथील कारखानदारीची वाढ, तरुणांच्या हाताला काम आणि महिला सुरक्षा यावरून विकासाचा मुद्दा पुढे केला आहे. यामुळे मतदारांमध्ये विश्वास वाढला असून ही निवडणूक खऱ्या अर्थाने आता शरद पवारांनी मतदारांच्या हाती दिल्याचे अजित गव्हाणे म्हणाले. भोसरीतील गाव जत्रा मैदानावर झालेली विराट सभा हे परिवर्तनाचे प्रतीक आहे. येथे आलेल्या प्रत्येक नागरिकाने निवडणूक हाती घेतली आहे.त्यामुळे परिवर्तन अटळ असल्याचा विश्वासही गव्हाणे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे त्यांच्या प्रचारार्थ भोसरीतील गाव जत्रा मैदानावर बुधवारी शरद पवार यांची सभा पार पडली. आजवरच्या गाव जत्रा मैदानावर झालेल्या सभेचे बुधवारी जमलेल्या गर्दीने रेकॉर्ड मोडले आहे असा दावा करून अजित गव्हाणे म्हणाले, या सभेमध्ये आलेला प्रत्येक नागरिक हा परिवर्तनाचा विश्वास घेऊन आला होता. यामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. महाराष्ट्रभर हीच परिस्थिती दिसून येत आहे. कारण महाराष्ट्राची औद्योगिक, सामाजिक प्रगती शरद पवारांच्या माध्यमातून झालेली प्रत्येकाने पाहिलेली आहे. त्यामुळेच भोसरीतील मतदार संघात या सभेनंतर “शरद पवारांचा युथ कनेक्ट” प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे. हाच तरुण वर्ग परिवर्तनाचा साक्षीदार होणार आहे. धर्म, जात या माध्यमातून तरुणांची माथी भडकवण्याचा खूप प्रयत्न झाला आणि होत आहे. मात्र तरुणांना देखील सारासार विचार केला आहे. हाताला काम, रोजगाराच्या संधी आणि महिलांची सुरक्षा या मुद्द्यावर भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन होणे अटळ आहे.
शिक्षण, रोजगारासाठी तरुणांची महाविकास आघाडीकडून अपेक्षा
अजित गव्हाणे म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड शहर, हिंजवडी तसेच या शहरालगतच्या चाकण, शिरूर अगदी सासवड, इंदापूर पर्यंत वाढवलेली कारखानदारी ही शरद पवारांच्या माध्यमातून आलेली आहे हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे येथील तरुण वर्ग मोठ्या अपेक्षेने महाविकास आघाडीकडे पाहत आहे. यातूनच परिवर्तन अटळ आहे .
दडपशाही झुगारून नागरिक परिवर्तनाच्या लढाईत सामील झाले आहेत. यात युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. शिक्षणाच्या नवीन संधी, महिला सुरक्षा, नामांकित शैक्षणिक संस्था शहरांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न, तरुणांसाठी स्मॉल क्लस्टर, पाण्याची मुबलक उपलब्धता, सामाजिक सलोखा या मुद्द्यांवरच आम्ही नागरिकांसमोर जात आहोत. केवळ जाहिरात बाजी करून, धर्माच्या नावावर माथी भडकवून शहराचा विकास होत नसतो हे नागरिकांच्या गेल्या दहा वर्षात लक्षात आले आहे.
अजित गव्हाणे
उमेदवार, महाविकास आघाडी
भोसरी विधानसभा मतदारसंघ