आण्णा गेले ! समाजसेवेसह माणुसकीचा झरा आटला

पुणे : टीम न्यू महाराष्ट्र

प्रत्येका‌विषयीची कमालीची आपुलकी, प्रेमभावना, संकटात तसेच अडीअडचणीत धावून जाण्याची वृत्ती, शिक्षणासाठी प्रोत्साहन देत ज्ञानझरा घरोघरी पोहोचविण्याचा ध्यास, शिक्षकांच्या नोकऱ्या कायमस्वरुपी करण्यासाठी थेट दिल्लीपर्यंत धडक देण्याचा लढाऊपणा, नवनवीन तंत्रज्ञानातून शाश्वत उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याची धडपड नि बारामती तालुक्यातील खांडज गावच्या विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झिजणाऱ्या तसेच सुनांनाही लेकीप्रमाणे जीव लावत संस्कारक्षम आदर्श कुटुंब घड‌विणाऱ्या शिवाजीराव साहेबराव बर्गे तथा सर्वांच्या लाडक्या अण्णांची देवाज्ञा झाली. अल्पशा आजाराने माळेगाव (ता. बारामती ) येथे त्यांची प्राणज्योत मालवली आणि खांडजसह बर्गे घराण्याचा आधारवड हरपला.

कुटुंबवत्सल आण्णा काळाच्या पडद्याआड गेले, तरीही आण्णाचे विचार कायमच खांडज, माळेगावकरांसोबत आहेत. खांडजच्या बर्गे घराण्याला वैचारिक वारसा मिळाला तो आण्णांमुळेच . सगळ्यांशी प्रेमाने बोलण्याची कला, अडीअडचणीत सर्वांना मदत करण्याचा स्वभाव, शिक्षणासाठी नवीन पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हे आण्णांचे वैशिष्ट्य. आण्णांनी माळेगाव शिक्षण प्रसारक मंडळावर विश्वस्त म्हणून अनेक वर्ष कामकाज पाहिले.आप्पासाहेब पवार यांच्यासोबत शेतीचे महत्व अनेक शेतकऱ्यांना त्यांनी पटवून दिले. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शाश्वत उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी मोठे कार्य केले.आण्णांनी त्याकाळी बीएस्सी अग्रीपर्यंत शिक्षण घेतले होते. सहजासहजी नोकरी मिळत असतानादेखील त्यांनी एकट्याचा विचार करण्याऐवजी भावंडांच्या शिक्षणाचा विचार केला. स्वतः शेती करून भावंडाना उच्च शिक्षित करण्याची जबाबदारी घेत त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. खांडज, माळेगाव पंचक्रोशीत प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्याची आवड असणारे सातत्याने राजकीय कार्यक्रमात सहभाग घेणारे आण्णा सर्वांचे लाडके नेते बनले. आज बर्गे कुटुंबात सूनांचे लेकिप्रमाने कौतुक होते ते आण्णाच्या वैचारिक प्रगल्भतेमुळेच. बर्गे घराण्यातील सूनांना दुरदृष्टीने विचार करण्याची सवय आण्णांमुळेच लागली. एकत्र कुटंबपद्धती टिकविण्यासाठी त्यांच्या पत्नी रज्जाक्का यांनी घेतलेले कष्ट व गेली १० वर्ष सातत्याने केलेली आण्णाची सेवा हे कौतुकास्पद आहे. आण्णांची मुले डॉ. मंगेश, प्रा. संजय, अॅड. किरण, सून डॉ. हेमलता आणि शुभांगी यांनी आण्णांची आजारपणात खूप काळजी घेतली.

आण्णांची जन्मतारीख 1947. आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी समाजोपयोगी अनेक कामे केली. खांडज येथे लोकवर्गणीतून शाळा सुरू केली. स्वखर्चातून त्यांनी शाळेसाठी काही सुविधा उपलब्ध केल्या. लोकनेते शरद पवार, अजित पवार यांनी देखील त्याकाळी मदत केली होती.सुरुवातील १० शिक्षक अर्ध्या पगारावर काम करीत होते. त्यांना पूर्ण पगार व शिक्षकांना पर्मनंट करण्यासाठी आण्णांनी खूप प्रयत्न केले. आण्णांनी मालेगाव शिक्षण प्रसारक मंडळावर विश्वस्त म्हणून ५ वर्ष काम पाहिले, नव तरुण मुलांना नोकरी लावण्यासाठी प्रयत्न केले. ग्राम स्वच्छ्तेसाठी पुढाकार घेतला. आप्पासाहेब पवार यांच्या सोबत कृषी क्षेत्रात भरीव कार्य केले. अनेक शेतकरी बांधवांना आधुनिक शेतीविषयक सल्ला दिला. यातून शेतकऱ्यांना उत्पन वाढण्यास, शेती विषयक समस्या निवारण करण्यास मदत झाली. लोकांच्या मनाचा ठाव घेऊन उत्तम भाषण करण्याची कला आण्णांना अवगत होती. सर्वांशी प्रेमाने, आपलकीने वागणाऱ्या आण्णांचे कुटुंबावर खूप प्रेम होते. घरात ते थोरले असल्याने सर्व लहान भावांची व बहिणींची शिक्षणे, लग्न आण्णांनी जबाबदारीने पार पाडली.

सामाजिक, कौटुंबिक, राजकीय तसेच सर्वच क्षेत्रालील आण्णांचे कार्य उल्लेखनीय होते. या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी राजश्रीआक्का यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांची मनोभावे सेवा करण्यात आण्णा पुढाकार घेत असत.खांडज गावच्या विकासासाठी, गावातील मुलांच्या शिक्षणसाठी, गावकऱ्यांचे आरोग्य, वीज, रस्ते, तसेच गावात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आण्णांची कायम धडपड सुरू असायची. त्यांचे बंधू ॲड. विजयकुमार बर्गे, कल्ल्याणराव बर्गे, उत्तम बर्गे यांची त्यांना कायम साथ लाभली. यमल भोसले, सुमन देशमुख, कमल पवार या त्यांच्या भगिनींनाही आण्णांचा कायम आधार होता. आण्णांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांचे पुतणे बारामतीचे प्रसिद्ध वकील अॅड. विशाल विजयकुमार बर्गे व अॅड. सुप्रिया विशाल बर्गे या यशश्री फाउंडेशनच्या मध्यामातून चालवीत आहेत. अनेक सामाजिक उपक्रम ते सातत्याने राबवित आहेत ,त्यांच्या कायदेविषयक ज्ञानाचा समाजातील प्रत्येक घटकास मदत होत असते. शिवाय त्यांचे चिंरजीव डॉ. मंगेश आणि सून डॉ. हेमलता हे सुद्धा वैद्यकीय क्षेत्रात गोरगरिब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार करण्याचे कार्य करीत आहेत. दिवंगत अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली.

गोविंद बर्गे ,पत्रकार पुणे.

Share

Leave a Reply