चिंचवड : टीम न्यू महाराष्ट्र
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि.२८) विधानसभेत सादर केला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. राज्यातील शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याची घोषणा म्हणजे जुमलेबाजी असल्याची टीका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर संघटक (चिंचवड विधानसभा) संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सौंदणकर म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला मतांसाठी चुचकारण्यासाठी सौरउर्जा पंप देण्याची घोषणा करण्यात आली. राज्याच्या कृषी क्षेत्रास संजीवनी देण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप आणि अखंडित वीजपुरवठ्याची हमी देण्याची महायुतीची ही केवळ घोषणा असून पुन्हा एकदा गाजराचं आश्वासनच म्हणाव लागेल. शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा हा कावेबाजपणा ओळखावा, असे आवाहनही सौंदणकर यांनी केले आहे.