दिल्ली : टीम न्यू महाराष्ट्र
देशात लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने नियोजन पत्रकार परिषदेमध्ये केले होते.त्यानुसार १९ एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, असे मतदानाचे एकूण सहा टप्पे पार पडले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याची तारीख १ जून आहे. त्यानंतर निकालाची प्रतिक्षा असेल. या सर्व टप्प्यांतील मतदानाची मतमोजणी ४ जून रोजी करून निकाल जाहीर केले जातील.अशातच महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले आहे. एकूण पाच टप्प्यात राज्यात मतदान पूर्ण झाले. २० मे रोजी शेवटचं मतदान झालं.दरम्यान यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत.महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळं या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते.या नियमानुसार महाराष्ट्रात आणि हरियाणात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो.मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, २१ ते २६ ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.