संभाजी महाराज पुतळा उभारणीच्या कामातील भ्रष्टाचारा विरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज (सोमवारी) महापालिकेसमोर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटिका सुलभा उबाळे, माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, माजी नगरसेविका विनया तापकीर, विनायक रणसुभे, संभाजी बिग्रेडचे सतीश काळे, अनिता तुतारे सहभागी झाले होते. ”भीक द्या, भीक द्या, आमदाराला भीक द्या, आयुक्ताला भीक द्या” अशा घोषणा दिल्या. पिंपरी चौकातून जाणा-या वाहनचालकांकडे भीक देण्याची मागणी केली. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. पुतळ्याला तडे गेले आहेत. हे भीक आयुक्तांना देणार असल्याचे आंदोलक शंभूभक्तांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फुटी पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामात प्रचंड अनागोंदी होत असल्याची माहिती नुकतीच महाविकास आघाडी व सामाजिक संघटनांनी उघडकीस आणली . पुतळा उभारणीचे काम प्राथमिक अवस्थेत असताना संभाजी महाराजांच्या ‘मोजडी’ला तडे गेल्याचे समोर आले. याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी रोष व्यक्त केला आहे . या कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला असल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबद्दल अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली आहे. यामुळे शहराच्या लौकिकाला देखील तडा गेला आहे. अशा प्रकारचा सत्ताधाऱ्यांचा मस्तवाल कारभार थांबवण्यासाठी आणि असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी आंदोलन केल्याचे सांगण्यात आले.

Share

Leave a Reply