नागरिकांच्या गाठीभेटी, संवादातून परिवर्तनाचा एल्गार
भोसरी 22 ऑक्टोबर (प्रतिनिधी)
मागील दहा वर्षात चुकीचा उमेदवार दिल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात म्हणावा तसा विकास झाला नाही. मागील दहा वर्षांचा विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे असे स्थायी समितीचे माझे अध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले. या मतदारसंघातील भ्रष्टाचार, आरेरावी ,मनमानी कारभार थांबवण्यासाठी नागरिकांनी परिवर्तनाची हाक दिली आहे.भोसरी विधानसभा मतदारसंघाचे गतवैभव परत आणण्यासाठी बदल घडविण्याची वेळ आली असल्याचेही गव्हाणे म्हणाले.
अजित गव्हाणे यांनी चिखलीतील पूर्णा नगर, शाहूनगर भागातील रिद्धी सिद्धी सोसायटी, गुरु प्रसाद सोसायटी, पूर्णा नगर सोसायटी क्रमांक 17, राजीव सोसायटीमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
यावेळी नागरिकांनी रस्ते, पाण्याची समस्या, विजेचा लपंडाव यांविषयी समस्या मांडल्या. अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, पावसाळ्यामध्ये पाणी साचण्याची समस्या, खड्डेमय रस्ते यांसारख्या समस्यांबाबत नागरिकांनी प्रश्नांचा पाढा गव्हाणे यांच्यासमोर वाचला.
यावेळी गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या स्थापनेपासून शहराला दूरदृष्टी असणारे नेतृत्व लाभले. या नेतृत्वातून शहराचा विकास झाला मात्र, गेल्या १० वर्षांमध्ये भोसरी विधानसभेची झालेली अधोगती हा निष्क्रिय नेतृत्वाचा परिणाम आहे. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. शहरातील प्रत्येक कामांमध्ये वारेमाप भ्रष्टाचार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे विकास कामांवर परिणाम झाला आहे. भ्रष्टाचार युक्त कामांमुळे कामाची गुणवत्ता ढासळली आहे . या सर्व गोष्टींना नागरिक कंटाळले असून आता परिवर्तन अटळ आहे असेही गव्हाणे म्हणाले.