अवैध वाळू उपसा प्रकरणातील मोठा निकाल: आरोपी निर्दोष, सरकारी यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह

बारामती ः  टीम न्यू महाराष्ट्र

 मेखळी (ता. बारामती) येथील कथित अवैध वाळू उपसा प्रकरणात बारामती येथील सत्र न्यायालयाने दोन आरोपींना निर्दोष मुक्त केले. सत्र न्यायाधीश   एच. ए. वाणी यांनी बाळासाहेब किसन बिचकूले व पोपट निकम (दोघेही रा. झारगडवाडी, ता. बारामती) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात 9 एप्रिल 2020 रोजी मेखळी येथील कर्‍हा नदी पात्रातून जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केल्याचा आरोप होता. घटनेच्या दिवशी तलाठी अश्विनी मगदूम व अन्य सरकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता, उपसा करणाऱ्यांनी तुम्हाला जे करायचंय ते करा अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला होता. त्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध IPC कलम 353, 379, 34 आणि खाण व खनिज (विकसन व विनियमन) अधिनियमातील कलम 15 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी, पंच साक्षीदार व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. लंगोटे यांचा समावेश होता. मात्र, आरोपी क्रमांक एकतर्फे अ‍ॅड. विशाल बर्गे यांनी पुराव्यातील तफावती कोर्टासमोर मांडल्या.

अ‍ॅड. बर्गे यांनी युक्तिवाद करताना निदर्शनास आणून दिले की, घटनास्थळी कोणतीही वाळू आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आली नव्हती, तसेच वाळूचे मोजमापही घेतले गेले नव्हते. फिर्यादीकडे गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी आदेश नव्हता आणि स्थानिक पातळीवर कुणाकडूनही तक्रार आलेली नव्हती. शिवाय, साक्षीदारांच्या साक्षीत अनेक विसंगती असल्याने त्यांचा विश्वासार्हता हरपली असल्याचे अ‍ॅड. बर्गे यांनी अधोरेखित केले.

कोर्टाने या युक्तिवादाला मान्यता देत, सरकारी पक्षाने आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याचे नमूद केले आणि आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपी क्रमांक दोन तर्फे अ‍ॅड. राजेंद्र काळे यांनी काम पाहिले. तसेच अ‍ॅड. राकेश तावरे व अ‍ॅड. राजेंद्र सोनावणे यांनी या खटल्यात सहकार्य केले.

Leave a Reply