– आमदारांच्या कार्यशैलीमुळे प्रचंड नाराजी; बाळासाहेब गव्हाणे यांची भाजपला सोडचिठ्ठी
-आमदार लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे भाजपचा गड कोसळतोय – बाळासाहेब गव्हाणे
-नगरसेवकांनाच माहित नाही त्यांच्या प्रभागात काय चाललंय- बाळासाहेब गव्हाणे
-भोसरी परिवर्तन अटळ आहे- बाळासाहेब गव्हाणे
-आता टीका केली म्हणता, तुम्हीही टीका करूनच निवडून आले; आमदारांना टोला
भोसरी, 11 नोव्हेंबर : पालिका टू पार्लमेंट आम्हाला सत्ता द्या. सगळे प्रश्न सोडवतो असा भाजपचा दावा होता. 2014 ते 2024 आम्ही यांना सत्ता दिली. मात्र गेल्या दहा वर्षात रेड झोनचा प्रश्न सुटला नाही. जागोजागी टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले आहे. भोसरी गावाला अक्षरशः बकालता आली आहे. भोसरीतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे हे त्यांनाच माहीत नाही. ‘नाराजीचे हे गळू मोठ्या प्रमाणात ठसठसत आहे’ कधी फुटेल सांगता येत नाही अशी घणाघाती टीका बाळासाहेब गव्हाणे यांनी केली.
भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे गेल्या 18 वर्षापासून भाजपमध्ये असलेले बाळासाहेब गव्हाणे हे पक्षातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी जाहीर केले. भाजपाचे गेल्या 18 वर्षापासून काम केले मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जी आश्वासन दिली गेली ती पाळली गेली नाहीत. भोसरीला अक्षरशः बकाल करण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले आहे. यामुळे या पक्षातून बाहेर पडत असल्याचे बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले.
बाळासाहेब गव्हाणे म्हणाले 2007 मध्ये भाजप मधील माझ्या काही सहकाऱ्यांच्या माध्यमातून या पक्षात प्रवेश केला. 2014 मध्ये आमदार महेश लांडगे यांचे अतिशय मनापासून काम केले कमी. कालावधीत त्यांचे नारळ चिन्ह घरोघर पोचवले. त्यातून त्यांनी विजय मिळवला. त्यावेळी काही आश्वासने त्यांनी दिली होती. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास नंतरच्या काळात ते विसरले. त्यांनी जे हिशोब मांडले होते. त्या हिशोबात मी बसणारा नव्हतो असे मला वाटते.
दहा वर्षात केवळ जाहिरातबाजी
विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केवळ जाहिरातबाजी केली. दहा वर्षात पाणी, रेड झोन असा एकही प्रश्न सुटला नाही. जागोजागी दहा वर्षात टपऱ्यांचे साम्राज्य उभा करण्याचे काम त्यांनी केले. भोसरीमध्ये पुरती बकालता आणली. आम्हाला देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पालिका टू पार्लमेंट सत्ता द्या आम्ही पिंपरी चिंचवडला सुजलाम सुफलाम करू. आम्ही शहरातून 77 नगरसेवक निवडून दिले. गेल्या दहा वर्षात भोसरी मधील अनेक नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे भोसरी मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे. नाराजीचे हे गळू ठसठसत आहे. हे कधी फुटेल सांगू शकत नाही. त्यामुळे भोसरीमध्ये परिवर्तन अटळ आहे असे देखील बाळासाहेब गव्हाणे म्हणाले.
आमदार महेश लांडगे विरोधकांवर आरोप केले म्हणून टीका करतात. मात्र तुम्हीही तेच केले.माजी आमदार विलास लांडे यांना तुम्ही किती ‘टार्गेट’ केले होते. या टीकेतूनच तुम्ही आमदार झालात. तुम्ही शहराला व्हिजन 20-20 चे गाजर दाखवले. त्यातील काय कामे तुम्ही केली. पालिकेच्या, नगरसेवकांच्या कामाचे क्रेडिट तुम्ही सुद्धा घेत आहात.
बाळासाहेब गव्हाणे
ज्येष्ठ नेते