पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
मेवाडचे राजे महाराणा प्रताप जसे शौर्य, बलिदान आणि दृढनिश्चय या गुणांमुळे ओळखले जातात, तसेच धर्मवीर संभाजी महाराज धर्मनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मला महाराणा प्रताप यांच्याबद्दल जेवढा आदरभाव आहे तेवढाच आदर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वाटत आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्याग आणि बलिदानापुढे संपूर्ण राजस्थान नतमस्तक होत आहे, असे मत महाराणा प्रताप यांचे वंशज लक्ष्यराज महाराज यांनी व्यक्त केले.
वढू येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हभप संग्राम बापू भंडारे, राहुल सोलापूरकर, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे, विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय मंत्री शंकर गायकर, भारतानंद स्वामी महाराज, अनिल भंडारे, संतोष शिवले, सोमनाथ भंडारे, अंकुश शिवले उपस्थित होते.
यावेळी महाराणा प्रताप यांचे वंशज असलेले लक्ष्यराज सिंह महाराज म्हणाले, मेवाड आणि महाराष्ट्र यांच्यात इतिहास काळापासून देशभक्तीचा समान धागा असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात शिक्षण आणि आपली महान संस्कृती यांच्या आधारावर 21 वे शतक भारतीयांचेच असणार असल्याचे ते म्हणाले. वढू येथील ग्रामस्थांच्या आपुलकीने मी भारावून गेलो असून मला मेवाडच्या प्रांगणात वावरत असल्याचा भास होत आहे असे ते म्हणाले. यावेळी राहुल सोलापूरकर तसेच शंकर गायकर यांनी संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचे दर्शन घडविले.
यावेळी राकेश दुलगज यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार निलेश भिसे यांना राजा शिवछत्रपती पत्रकार पुरस्कार तर शरद महाराज भोसले यांना शंभू सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. हॅलीकॅप्टर मधून धर्मवीर संभाजी महाराज समाधी परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी हजारोंच्या संख्येने युवक छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.