-भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आयोजित कार्यक्रमाला १ लाखांहून अधिक नागरिकांची हजेरी
चिंचवड, टीम न्यू महाराष्ट्र:
लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला महिलांसाठी महाभोंडला व रावणदहन सोहळ्याला पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवड शहरातील लाखो नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे १ लाखांहून अधिक नागरिकांच्या साक्षीने अहंकाराचे रुपी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
सांगवी येथील पीडब्लूडी ग्राउंडवर शनिवारी (दि. १२ ) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत हा सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी माता आणि स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच उद्योगमहर्षी, पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांनाही आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाभोंडला कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शालिनीताई ग्रुप, परंपरा ग्रुप, अनुभूती ग्रुपच्या महिलांनी प्रथम गोंधळी नृत्यातून मंगळागौरीचा जागर केला. तर डोनेटेड सोसायटी ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ ग्रुप, राधाकृष्ण ग्रुप, वृंदावन ग्रुपच्या महिलांनी रासगरबा नृत्याचे सादरीकरण केले. तसेच मयूर डान्स अकॅडमीच्या मानसी भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केलेल्या ‘रामयणा’वर आधारित कथ्थक नृत्य तर ‘दम दमा दम’ या रिऍलिटी शोचे विजेते नृत्य कलाकार यांनी तानाजी मालुसरे यांच्यावरील ‘गड आला पण सिंह गेला’ थीमवर आधारित नृत्य सादर केले. यावेळी महाभोंडला कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला ग्रुपला आयोजकांच्या वतीने विशेष भेटवस्तू देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटात शंभूराजांची भूमिका साकारलेले कलाकार अनुप सिंग ठाकूर, चित्रपटाचे दिग्दर्शक दादा पाटील, आणि सहकलाकार श्रद्धा शिंदे यांनी विशेष हजेरी लावली. याप्रसंगी दाखविण्यात आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जयजयकार करून भरभरून दाद दिली.
त्याचबरोबर युट्युबवरील गाजलेल्या ‘चांडाळ चौकटीच्या करामती’ या वेबसिरीजचे कलाकार भरत शिंदे, रामभाऊ जगताप आणि सुभाष मदने यांनी सादर केलेल्या ‘ग्रामपंचायतीच्या ग्रामसभे’च्या विनोदी नाट्याने उपस्थितांचे पुरेपूर मनोरंजन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना शंकर जगताप म्हणाले की, आज या कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी ही पिंपळे गुरव, सांगवी आणि पिंपरी चिंचवडकरांचे आमच्या जगताप कुटुंबावर तसेच सर्व कार्यकर्त्यांवर असलेल्या प्रेमाची खरी पोचपावती आहे. जे प्रेम आजपर्यंत तुम्ही स्व. लक्ष्मणभाऊंवर केले तेच प्रेम यापुढील काळात आम्हा सर्वांवर निरंतर राहू द्या. तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, याची मी आपणास ग्वाही देतो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. हेमंत हरहरे यांनी यावेळी सांगितले की, येणारी विधानसभा निवडणूक ही अधर्मी विरुद्ध निधर्मी अशी आहे. ही हिंदुत्वाची निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील २८८ जागांवर हिंदुत्ववादी विचारसारणीच्याच उमेदवारांना निवडून आणत राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आपल्याला आणायचे आहे, असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.
दरम्यान, शंकर जगताप यांच्या हस्ते रिमोटच्या माध्यमातून ७० फुटी रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या कार्यक्रमाला विधानपरिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर सचिन चिंचवडे, भाजपा निमंत्रित सदस्य भारतीताई विनोदे, संतोष कलाटे, स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उद्योजक विजुशेठ जगताप, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.