चेक बाऊंस; आरोपीला एक महिन्याचा तुरुंगवास

बारामती ः  टीम न्यू महाराष्ट्र

धनादेश न वटलेप्रकरणी एका आरोपीला एक महिना तुरुंगवास, एक हजार रुपये दंड व ७५ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश बारामतीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.    

नितिन महादेव कुर्ले ( रा. बुरुड गल्ली, बारामती, जि. पुणे) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुनील टकले यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आरोपी कुर्ले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा खटला बारामती न्यायालयात सुरु होता. नुकताच या खटल्याची अंतिम सुनावणी होऊन निकाल जाहिर करण्यात आला.

याबाबतची सविस्तर माहिती अशी, फिर्यादी  टकले हे बारामती येथील प्रसिद्ध टेलर आहेत. आरोपी व फिर्यादी हे जुने मित्र होते. आरोपीने कोरोना काळात घरगुती आर्थिक अडचणींमुळे फिर्यादीकडून रुपये ७५ हजार रुपये  बिनव्याजी हात उसने पैसे घेतले होते. तसेच त्याचा नोटरी करारनामा लिहून दिला होता. परंतु, वेळेत पैशाची परतफेड आरोपीने केली नाही. म्हणून फिर्यादीने आरोपीने दिलेला धनादेश  स्वतः च्या बँक खात्यावर भरला. मात्र,  तो न वटता परत आला. त्यामुळे फिर्यादी यांनी  अ‍ॅड. विशाल विजयकुमार बर्गे यांच्यामार्फत नोटीस पाठवून पुढे बारामती कोर्टात फौजदारी खटला दाखल केला होता.

या खटल्यादरम्यान फिर्यादीला आरोपीने वेळोवेळी सदर रक्कम दिली. परंतु, उभयतांमधील जुन्या एका आर्थिक व्यवहारातील एक चेक फिर्यादीने वापरुन मुद्दाम पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा खोटा खटला दाखल केल्याचा बनाव आरोपीने केला. फिर्यादीतर्फे अ‍ॅड. विशाल बर्गे यांनी बाजू मांडली. नोटरी तसेच चेकबाबत फिर्यादीने गैरवापर करू नये म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही अथवा त्याच्या बॅंकेत जाऊन चेक बाबत स्टॉप पेमेंट केले नाही. वकिलांच्या नोटिशीला तत्काळ उत्तर देऊन स्वतःची बाजू मांडली नाही.

तसेच वकीलपत्र, नोटरी आणि चेकवरील आरोपीची सही सारखीच आहे. आरोपीने चेकवरील सही नाकारली नाही. या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निकाल फिर्यादीचे वकील अ‍ॅड. विशाल बर्गे यांनी कोर्टात सादर केले.  अ‍ॅड. बर्गे यांचा हा युक्तिवाद मान्य करून  कोर्टाने आरोपीला एक महिन्याचा तुरूंगवास, दंड तसेच फिर्यादीला आरोपीने नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.

Share

Leave a Reply