पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
बदलापूरमधील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच चिखली- मोरेवस्ती, ताम्हाणे वस्ती, कृष्णानगर या परिसरातील मातोश्री विद्यालय, मनपा, मराठी शाळा क्रमांक 92, हौसाबाई मोरे विद्यालय, एस. डी. गणगे प्रशाला, नागनाथ गडसिंग महाविद्यालय या शाळांना भेटी दिल्या तसेच शाळा प्रशासनासह मुख्याध्यापकांना निवदेन दिले. शाळांमध्ये ‘सखी सावित्री समिती’ गठित करावी. शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करावे. शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. विद्यार्थिनींच्या शौचालयाजवळ महिला मदतनीस नियुक्त करावी. प्राथमिक शाळेतील लहान वयोगटातील मुलांसाठी ‘गुड टच, बॅड टच’ याबाबत सांगितले जावे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतील तर चर्चा करण्यासाठी कौन्सलिंग टीम नियुक्त करण्यात यावी. या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख नेताजी काशिद, शहर संघटक रावसाहेब थोरात, राहुल भोसले, संजय गाढवे, प्रवीण पाटील, दादा ठाकरे, अशोक गायकवाड, अनंत मते, हरिभाऊ लोहकरे, विजय शिवपुजे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.