पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
शिरूर टाकळीहाजी (ता. शिरूर) येथील परिसरातील उचाळेवस्ती येथे हिंदू देवतांबद्दल अपशब्द व अपमानास्पद भाष्य करणे आणि ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी दबाव टाकण्यात आला. यानंतर भेदरलेल्या संबंधित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी हात वर केल्यानंतर हा प्रकार भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या कानावर घालण्यात आला. आ. लांडगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी दबाव आणल्या प्रकरणी शेतकरी राहुल मारुती गायकवाड (वय ३९, रा. उचाळेवस्ती-टाकळीहाजी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रशांत जालिंधर घोडे (रा.उचाळेवस्ती-टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे), मोजस बार्बनबस डेव्हिड (रा.२०४ लिव्ह गॅलेक्सी, गोकुळ सोसायटी, डोरेबाळा रोडनागपुर ता. जि. नागपुर), अमोल विठ्ठलराव गायकवाड (रा. प्लॉट नं. १४६९, आयुषी अपार्टमेंट, न्यु नंदनवन नागपुर, ता. जि. नागपुर), योगेश संभुवेल रक्षत (रा.६/१७, रामबाग कॉलनी, मेडीकल चौक नागपुर, ता. जि. नागपुर), जेसी ऍलिस्टर अँथोनी (रा.२०२ गणराज फोर रेसिडेन्सी, टाकळी, नागपुर, ता.जि. नागपुर), कुणाल जितेश भावणे (रा. बाजारचौक-आंधळगाव, ता. मोहोळ, जि. भंडारा), सिध्दांत सदार कांबळे (रा. रेड्डी इन क्लब मुंढवा, केशवनगर, हनुमान नगर, पुणे) या सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (१ मे रोजी) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास राहुल गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत घरासमोर बसले होते. यावेळी प्रशांत जालिंदर घोडे व त्याच्यासोबत सहा अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आले. “तुम्ही कोणत्या धर्माचे?” अशी विचित्र चौकशी करत,”बायबल वाचा, चर्चमध्ये या, तुमच्यावर प्रभु येशूची कृपा होईल,” असे सांगत धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकला.” तुमच्या देवांनी काय केलं?” असा सवाल करत, सात जणांचे टोळके उचाळेवस्ती येथील गायकवाड कुटुंबाच्या दारात येऊन बसला! “प्रभु येशूला मान्य करा, चर्चमध्ये या, आर्थिक फायदा होईल असे अमिष दाखवले. त्यानंतर भेदरलेल्या गायकवाड कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला पोलिसांनी या घटनेबाबत दखल घेतली नाही. मात्र, आमदार महेश लांडगे यांच्या कानावर हा प्रकार जातच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
धर्मपरिवर्तनासाठी गावागावात नागरिकांवर दबाव
शिरूर परिसरामध्ये वारंवार धर्म परिवर्तनासाठी दबाव आणला जात आहे. मात्र पोलिसांकडून याबाबत योग्य कारवाई केली जात नाही. वेळीच कारवाई होत नसल्यामुळे धर्म परिवर्तनासाठी फिरणाऱ्या लोकांचे फावले आहे, असा आरोप बजरंग दलाच्या वतीने करण्यात आला आहे. पोलिसांनी अशा प्रकारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे.
धर्म परिवर्तन करण्यासाठी नागरिकांवर दबाव आणणे. त्यासाठी गावागावात फिरणे. हिंदू देवदेवतांचा अपमान करणे. अवमानकारक भाषा वापरणे हे सर्व प्रकार जाणीवपूर्वक केले जात आहेत. अशा प्रकाराबाबत तक्रार आल्यानंतर पोलिसांनी याबाबत कडक कारवाई तात्काळ करणे अपेक्षित आहे. वेळीच असे प्रकार रोखले नाही तर समाजातील अनुचित घटना वाढत जातील. राज्य सरकारनेही या प्रकारांची दखल घेतली आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.