शाहू महाराजांविषयीचे मंडलिकांचे वादग्रस्त विधान राजकीय स्वार्थासाठीच : संजय राऊत

मुंबई  : टीम न्यू महाराष्ट्र 

छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नाहीत, असे  वादग्नस्त विधान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर  खोचक टिका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीची चांगलीच अडचण झाली आहे. दरम्यान, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मंडलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.  छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्याचे खरे वारसदार नसतील तर मग संजय मंडलिक हे वारसदार आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी  केला आहे. राजकीय स्वार्थासाठीच मंडलिकांनी त्यांच्या विषयी वादग्रस्त भाषा वापरली. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी मंडलिकांना दिला.

संजय राऊत म्हणाले,  सदाशिवराव मंडलिक हे  शाहू, फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच कोल्हापुरात काम करत होते. कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची, शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत  पायाखालची वाळू सरकल्यामुळेच संजय मंडलिक यांनी महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानावर चिखलफेक केल्याची टीका  राऊत यांनी केली. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून भूमिका घेतलेली आहे. ते आधीपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. मात्र, निवडणूक काळात राजकीय स्वार्थासाठी मंडलिकांनी त्यांच्या विषयी वादग्रस्त भाषा वापरली. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असा इशाराही राऊत यांनी मंडलिकांनी दिला.

संजय मंडलिक यांचा बोलविता धनी कोण ?

संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज  यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते कोल्हापूरचे नसून खरे वारसदार नसल्याचेही विधान केले आहे. ते चुकीचे आहे. संजय मंडलिक यांचा बोलविता धनी कोण? असा सवाल काँग्रेसच्या सतेज पाटल यांनी केला आहे.

कोल्हापुरात शाहू प्रेमींची निर्दशने

संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी  शाहू प्रेमी कोल्हापूरकरांनी गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरातील दसरा चौकात निदर्शने केली. संजय मंडलिक यांनी कोल्हापूरच्या गादीचा आणि जनतेचा अपमान केला असल्याने त्यांनी माफी मागावी , अशी मागणी या वेळी आंदोलकांनी केली. शाहू महाराज छत्रपतींच्या वारसावर प्रश्न उपस्थित करून संजय मंडलिक यांनी नवा वाद ओढून घेतला आहे. शिवाय आपण माफी मागणार नसल्याचे त्यांनी म्हटल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply