पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
वृक्षवल्ली वनचरी आम्हा सोयरी, या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंगाची आठवण देहूरोड येथील मुरगन टेंपल परिसरात आल्यानंतर प्रकर्षाने होते. कारण ऐन उन्हाळ्यात हा परिसर हिरवाईने नटलेला पहायला मिळतो. यामध्ये विविध प्रकारच्या देशी तसेच औषधी वनस्पतींचा समावेश आहे. देहूरोड येथील निसर्ग प्रेमी ग्रुपसह युनिटी फ्रेंडस क्लब आणि चिखली येथील नवसंकल्प ग्रुपच्या मदतीने येथे हा हिरवा निसर्ग बहरला आहे. सध्याच्या कडक उन्हामुळे वृक्ष जगविण्यासाठी या भागात पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे वृक्षांना नियमित पाणी देणे शक्य होणार आहे.
देहूरोड शहर परिसरातील नियमित माॅर्निंग वाॅक करणाऱ्या काही ज्येष्ठांसह रुणांनी एकत्र येत निसर्ग प्रेमी ग्रुपची स्थापना केली. या ग्रुपच्या माध्यमातून १२ वर्षांपूर्वी निर्सग संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुरगन टेंपलच्या पाठीमागील डोंगरावर वृक्ष लागवड करण्यात सुरुवात करण्यात आली. हळूहळू वड, पिंपळ, अशोक, अर्जुन, कदंब अशा देशी वृक्षांसह वनौषधींची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करुन हे तरुण थांबले नाहीत. तर त्यांनी वृक्षसंवर्धनावर विशेष भर दिला. प्रत्येक जण नियमित सकाळी या वृक्षांना पाणी देण्याची जबाबदारी स्वयंस्फुर्तीने घेऊ लागला. त्यासाठी पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनची व्यवस्थाही करण्यात आली. आज या परिसरात सुमारे दोनशे वृक्ष बहरलेले पहायला मिळत आहेत. हे सर्व वृक्ष १०ते १५फुट उंचीपर्यंत वाढलेले आहेत.
मुरगन टेंपल हा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने निर्सगप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी वनविभागाची रितसर परवानगी घेत येथे वृक्षारोपण, पाईपलाईन आणि पाण्याच्या टाक्यांची उभारणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या निसर्ग संवर्धनासाठी युनिटी फ्रेंडस क्लब आणि चिखली येथील नवसंकल्प ग्रुपच्या सदस्यांनीही या कामात स्वतःला झोकून दिले आहे. त्यामुळे सध्याच्या रणरणत्या उन्हात हा परिसर मनाला भुरळ घालू लागला आहे.
आगामी काळात या परिसरात पाच हजार वृक्षलागवड करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे. आॅक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करुन हा परिसर आॅक्सिजन पार्क म्हणून नावारुपाला आणण्याचा निर्सग प्रेमींचा निर्धार असल्याची माहिती निर्सग प्रेमी ग्रुपचे सदस्य डॅनियल चक्रनारायण यांनी दिली.