चिखली ः टिम न्यू महाराष्ट्र
पावसाळ्यात डेंग्यू, कावीळ, अतिसार, मलेरिया यांसारखे आजार डोके वर काढू लागले आहे. चिखली कुदळवाडी परिसरात मलेरियासह तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना राबविण्याची मागणी केली.
कुदळवाडी प्रभागात घाणीचे साम्राज्य आणि पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. या परिसरात स्वच्छतेसाठी पालिका स्तरावर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरियाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. प्रशासनाने साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने प्रभागात धुरळीकरण व औषध फवारणी, जलद ताप सर्वेक्षणासाठी पथकाची नियुक्ती व तापाच्या रुग्णांची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी दिनेश यादव यांनी क्षेत्रिय अधिकारी बहुरे यांना निवदेनाद्वारे केली आहे. यावेळी पंकज यादव, संदिप यादव उपस्थित होते.