डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका”- सुषमा अंधारे

पुणे – टीम न्यू महाराष्ट्र

पुणे अपघात प्रकरणामधील ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी अटकेत असलेले डॉ. अजय तावरे यांच्या जीवाला धोका असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषद घेत यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
पुणे अपघात प्रकरणामध्ये आरोग्य विभागाने कशा प्रकारे भोंगळ कारभार केला हे चव्हाट्यावर आलं आहे. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले होते. तीन लाखांमध्ये हे सर्व काही घडवून आणल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. पोलिसांनी यामध्ये डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांना अटक केली आहे. अटकेत असलेल्या अजय तावरे याने माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी डॉक्टरांच्या जीवाला धोका असू शकतो असं म्हटलं आहे.आर्यन खान प्रकरणाचं पुढे काय झालं, या प्रकरणामधील महत्त्वाचा साक्षीदार असलेला प्रभाकर साहिल याचा मृत्यू झाला. त्यानंतर ललित पाटीलही बोलले माझ्याकडे अनेक नावे आहेत पण पुढे चौकशीमध्ये काय बोलला काहीही समोर आलं नाही. आता पोर्षे कार अपघात प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी डॉ. अजय तावरे यानेही सारखंच वक्तव्य केलं आहे. माझ्याकडे भरपूर नावे आहेत कोणालाही सोडणार नाही. त्यामुळे त्याची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. कारण पोर्षे कार प्रकरणामध्ये मोठे प्रस्थ आहेत आरोपीला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे अजय तावरेच्या जीविताला धोका होऊ शकतो, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोपर्यंत डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी नक्कीच वाटत असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Share

Leave a Reply