पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
पुणेकर महिला या खूप कार्यशील आहेत. शासनाच्या पिंक रिक्षा योजनेचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा. पुणे शहरातील महिला सायकल चालवतात हे पुण्याचे विशेष आहे. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत हा पुण्याचा अभिमान आहे. पुढील काळात महिलांनी स्वतःचे वेगवेगळे गट बनवून आपापले स्टार्टअप उद्योग उभे करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष , पद्मश्री अरुण फिरोदिया यांनी केले.
दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात दुर्गाशक्ती पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उद्योजिका जयश्री फिरोदिया, डॉ. एम.आय.टी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका सुनिता कराड, आयबीएन लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे, ए.बी.पी माझाच्या पत्रकार शिवानी पांढरे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, अनुराधा गोरखे , सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष स्नेहल नवलाखा, सामाजिक कार्यकर्त्या अनमोल पुणेकर आदी उपस्थित होते.
या वेळी दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे पिंपरी चिंचवड स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर आणि दुर्गा ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते जयश्री फिरोदिया, डॉ. सुनिता कराड, एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, स्नेहल नवलाखा तसेच सामाजिक कार्यकर्त्या अनमोल पुणेकर यांचा दुर्गाशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी केलेल्या महिला भगिनींचाही या वेळी पुरस्कार्थी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
मुलींनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे
डॉ सुनिता कराड यांनी महिलांनी आणि मुलींनी आधुनिक तंत्रज्ञान शिकून घ्यावे आणि स्वतः कौशल्य विकसित करून रोजगाराच्या अनेक संधींचा लाभ घ्यावा. यासाठी एमआयटी कॉलेज कडून नक्कीच सहकार्याची भूमिका घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. तर चंद्रकांत इंदुलकर म्हणाले, महानगरपालिकेतर्फे महिलांसाठी काचघर सारखे अनेक प्रकल्प उभे करण्यात आले आहेत. त्याचा शहरातील महिलांनी लाभ घ्यावा.
पिंपरी चिंचवड एमआयडीसी परिसरात 5000 कंपन्या असून या कंपन्यांना मूलभूत सुविधांपासून अनेक वस्तूंची गरज असते आणि या वस्तू निर्मितीमध्ये आणि सेवा क्षेत्रात महिलांनी पुढाकार घेतल्यास त्यांना रोजगाराच्या संधी संघटनेतर्फे निश्चितपणे देण्यात येतील.
अभय भोर, अध्यक्ष ः पिंपरी चिंचवड स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोशिएशन.
महिलांना स्व:रक्षणार्थ प्रशिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पूर्वी महिलांवर अत्याचार व्हायचे. परंतु, सध्या लहान मुलींवर सुद्धा असे अतिप्रसंग घडण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे महिला आणि मुलींनी स्वः प्रशिक्षणार्थ प्रशिक्षण घेऊन संकटांवर मात करण्यासाठी खंबीर होण्याची गरज आहे.
– दुर्गा भोर : संस्थापक, अध्यक्षा, दुर्गा ब्रिगेड.