पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
गेल्या काही दिवसांपासून मोशी, चिखली, तळवडे, सोनवणे वस्ती आदी परिसरामध्ये वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील लघुउद्योजक, छोटे दुकानदार आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मोशी, चिखली, तळवडे, वस्ती सोनवने आदी परिसरामध्ये लघुउद्योजकांचे कारखाने, वर्कशॉप आहेत. येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना वेळेत काम पूर्ण करण्यात समस्या येत आहेत. कामामध्ये व्यत्यय आल्याने कामगारांना बसवून ठेवावे लागते. वेळप्रसंगी कामगारांना जादा कामासाठी थांबवावे लागते. कामगारांवर अधिकचा ताण येत आहे. उद्योजकांना त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर उत्पादन निर्मितीवर परिणाम होतो. छोट्या उद्योगांकडून मोठ्या उद्योगांना पुरविण्यात येणारे सुटे भाग तयार करण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे मोठ्या ऑर्डर वेळेत पुर्ण करता येत नाही. तर, दुसरीकडे आर्थिक नुकसान देखील होत आहे. लघुउद्योजकांच्या यापूर्वी ब-याच वेळा बैठका झाल्या आहेत. या बैठकांची फलनिष्पत्ती म्हणजे महावितरणकडून शहरातील एमआयडीसी पट्ट्यातील 2 फीडरची दुरुस्ती करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या सुटण्यासाठी महावितरणकडून आणखी उपाययोजना होण्याची गरज आहे, असे मत उद्योजकांनी व्यक्त केले.
शहरातील एमआयडीसी परिसरात सगळ्याच भागामध्ये खंडित वीज पुरवठ्याची समस्या जाणवत आहे. महावितरणकडून एमआयडीसी परिसरात दोन फीडरची दुरुस्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळाच्या कमरतेमुळे सुरळीत वीज पुरवठ्यासाठी आवश्यक दुरुस्तीचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. त्यामुळे अद्याप दुरुस्तीची पूर्ण कामे झालेली नाहीत असे पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.