पुणे: टीम न्यू महाराष्ट्र
पुणे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांना 25 लाख रुपयांची खंडणी मागत राजकीय कारकीर्द संपवून टाकण्याची धमकी दिली आहे.
याबाबत बिडकर यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार अर्ज दिला आहे. बिडकर रविवारी (दि.5 मे) सायंकाळी लष्कर भागातील एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर परदेशातून एकाने संपर्क साधला. अनोळखी व्यक्तीने बिडकर यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली.
खंडणी न दिल्यास राजकीय कारकीर्द संपवून टाकू, तसेच समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करु, अशी धमकी अनोळखी क्रमांकावरून देण्यात आली. बिडकर यांनी सोमवारी याबाबत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली. बिडकर यांना धमकावणारा दूरध्वनी परदेशातून करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.