एम. डी. चौधरींकडून नुकसान भरपाईची मागणी
मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र
मावळ तालुक्यातील कांब्रे ना. मा. या गावात महावितरणच्या भाेंगळ कारभाराने एका शेतकऱ्याचा नाहळ बळी गेला. तुटलेली महावितरणची विद्यूत तार अंगावरुन पडल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या दुघर्टनेला जबाबदार असलेल्या महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन शेतकऱ्याचा वारसांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
यासंदर्भात चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे नुकतीच तक्रार दाखल केली आहे. मावळ तालुक्यातील कांब्रे ना.मा. येथे महावितरणची विद्यूत तार अंगावर पडून श्रीकांत गायकवाड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महावितरणकडून गायकवाड कुटुंबाला तुटपुंजी मदत देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळेच गायकवाड यांचा मृत्यू झाल्याची त्यांच्या कुटुंबियांची तक्रार आहे. तसेच या गावात महावितरणचे तुटलेले, वाकलेले विजेचे खांब, लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा आहेत. या तारांमुळे अनेकदा गंजी पेटण्याच्या घटना घडल्या आहेत. या धोदायक विद्यूत तारांच्या दुरुस्तीसाठी कांब्रे ना. मा. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी राजगुरुनगर येथील महावतिरण कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, या कार्यालायतील अधिकाऱ्यांनी या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडली आणि त्यात श्रीकांत गायकवाड यांचा नाहक बळी गेल्याचा आरोप चौधरी यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर विदयुत निरीक्षण पुणे यांच्याकडून महावितरणला या घटनेचा अहवाल सादर करण्यात आला. त्यात तुटून पडलेली वीज वाहक तार उचलून बाजुला करताना विजेचा धक्का लागून गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, हा अहवाल चुकीच व दिशाभूल करणारा आहे. तुटलेली वीज वाहक तार अंगावर पडून गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांच्या पत्नी प्रितम गायकवाड यांनी दिले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या घटनेला जबाबदार असलेल्या महावितरणच्या राजगुरुनगर कार्यालयातील संंबंधीत अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन गायकवाड यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची मागणी चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केलेल्या तक्रारी केली आहे. दरम्यान, या संदर्भात महावितरण राजगुरुनगर कार्यालयाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
महावितरणच्या बेजाबदार कारभारामुळे अनेक दुर्घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. अशा घटनांमध्ये नागरिकांसह जनावरांचे हकनाक बळी गेले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी महावितरणकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. कांब्रे ना. मा. येथील गायकवाड कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली आहे. तेथे नक्कीच न्याय मिळेल.
एम. डी. चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष, ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन