चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
आकुर्डी येथील बीना इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजित राज्यस्तरीय अर्निस चॅम्पियनशिप स्पर्धेत सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या कराटेपटुंनी पिंपरी चिंचवड संघाकडून खेळताना ३ सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्यपदक पटकवित दैदिप्यमान यश मिळवले. या खेळाडूंची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर पिंपरी चिंचवड आणि सातारा जिल्हा संघीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड संघातून खेळणाऱ्या सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजच्या वेदांत मांढरे, अक्षय मांढरे, आलोक मांढरे यांनी सुवर्ण पदक पटकावले. तर देवेंद्र देवासी आणि स्वरा सुरवसे यांनी रौप्य तसेच श्रेयश फाटक याने कांस्य पदकावर नाव कोरले.
या यशाबद्दल स्कुलच्या अध्यक्षा निर्मला जाधव, सचिव मारूती जाधव, महाराष्ट्र राज्य अर्निस संघटनेचे अध्यक्ष पी. वाय आत्तार, रविराज गाढवे व शिक्षकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक गणेश मांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या खेळाडूंची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.