छत्रपती संभाजीनगर ः टीम न्यू महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी मराठवाडा विभागीय अधिवेशनात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांसाठी महत्त्वाची घोषणा केली. पत्रकारांसाठी स्वतंत्र विभागीय पत्रकार भवन उभारण्यासाठी शासनातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
संत एकनाथ रंगमंदिरात पार पडलेल्या या अधिवेशनात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. अधिवेशनाचे उद्घाटन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना. अतुल सावे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्रात ‘पत्रकारांचा डीएनए कोणता?’ या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादात पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांनी परखड विचार मांडले.
पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकार संघाच्या सामाजिक दायित्वाचे विस्तृत वर्णन करत पत्रकार संघटना ही पत्रकारांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी एकमेव संघटना असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवणारे संघटना असल्याचे स्पष्ट केले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकारांच्या सामाजिक दायित्वावर सखोल मार्गदर्शन करत लेखनीचा उपयोग लोकहितासाठी करण्याचे आवाहन केले. “कोरोना काळात पत्रकार संघाने जे काम केले त्याची शासनानेही दखल घेतली आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात ‘मराठवाडा भूषण 2025’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वरिष्ठ सनदी अधिकारी जी. श्रीकांत, हास्य अभिनेता योगेश शिरसाट, संपादक शेख मुजीब यांच्यासह अनेक मान्यवरांचा या पुरस्काराने गौरव झाला.
पत्रकारांना आधार देणे ही शासनाची जबाबदारी
“पत्रकार हे समाजाचे आरसे असतात. त्यांना काम करताना आधार देणं ही शासनाची जबाबदारी आहे. छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय पत्रकार भवनासाठी शासनाकडून जागा दिली जाईल व आम्ही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू,अशी ग्वाही पालकमंत्री शिरसाट यांनी या वेळी दिली.
मंत्री अतुल सावे म्हणाले की, अलिकडच्या काळात पत्रकारांशी आमचा दररोज संवाद असतो. कधी कधी दिवसातून तीन-चार वेळा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते.
छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष देवीदास कोळेकर,जिल्हा उपाध्यक्ष भांबर्डे, मराठवाडा सल्लागार विलास इंगळे, सह सचिव मनोज पाटणी, सचिव महेंद्र डेंगळे, प्रसिध्दी प्रमुख सचिन अंभोरे, संपर्क प्रमुख सुजीत ताजणे, सह सचिव रविंद्र लांडगे, ज्ञानेश्वर तांबे, संतराम मगर, आनंद अंभोरे, माधव खिल्लारे, गोपाळजी पटेल, लक्ष्मीनारायण राठी, राजू परदेशी आदिंनी अधिवेश यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
“पत्रकार आणि राज्यकर्त्यांचे संबंध अंबटगोड असले पाहिजेत, हेच लोकशाहीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे,”
-अशोक वानखेडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन
