पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
देशातील लोकसभा निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यातील तीन टप्पे एप्रिल तर चार टप्पे मे महिन्यात होणार आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात देशभरातील बहुतांश भागातील हवामान सामान्य पेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यासाठी सरसावला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू यांनी हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी उष्णतेच्या लाटेच्या संबंधात हवामान विभाग निवडणूक आयोगाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, हवामान विभागाकडून हंगामी अंदाजासोबतच मासिक, आठवडा आणि दैनंदिन अंदाज निवडणूक विभागाला पाठवले जात आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात कमाल तापमान सामान्य पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. मध्य भारत आणि पश्चिम द्वीपकल्पीय भारतावरील उष्णतेच्या लाटेचा धोका अधिक असल्याचेही महापात्रा यांनी सांगितले.
चार टक्क्यांनी मतदान घटले
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला. यामध्ये 60 टक्के मतदान झाले. हे मतदान मागील निवडणुकीपेक्षा चार टक्क्यांनी कमी झाले आहे. अनेक ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले आहे. कडक उन्हाळा हे यासाठी एक कारण दिले जात आहे.
मे महिन्यात चार टप्पे
लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल महिन्यात तीन तर मे महिन्यामध्ये 7, 13, 20, 25 मे अशा चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यातच मे महिन्यामध्ये सामान्य पेक्षा जास्त तापमान राहणार असल्याची शक्यता वर्तवली गेल्याने मतदार किती प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतील याबाबत साशंकता आहे. त्यातच मुलांच्या शाळांना सुट्टी असल्याने अनेक पालक गावी जात आहेत. याचा देखील मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम पडण्याची शक्यता आहे.