बरलोटा नगरमध्ये टवाळखोरांचा उपद्रव वाढला; ह्युमन राईटची पोलिसांकडे तक्रार

पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र

देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मामुर्डी येथील बरलोटा नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उपद्रव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. महिला आणि मुलींना सायंकाळी घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने अखेर स्थानिक रहिवाशांनी ह्युमन राईट असोशिएशन फॅार प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार वाघमारे यांची भेट  घेऊन त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

या बाबत बरलोटा नगरमधील तब्बल १३० रहिवाशांच्या स्वाक्षरीचे निवदेन पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी देण्यात आले. या वेळी  एम. डी. चौधरी, ओमप्रकाश पिल्ले, अजय कमल संनन, जावेद जमादार व संतोष रमेशन उपस्थित होते. उपस्थित शिष्टमंडळाने टवाळखोरांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा पाढाच वाघमारे यांच्या समोर मांडला. परिसरातील टवाळखोर मुले टोळक्याने सोसायट्यांच्या आवारात उभे असतात.  मुलींची छेड काढणे,  मोठ्या आवाजात शिवीगाळ करणे , कर्णकर्कश  आवाजात दुचाकी चालवणे. टोळक्याने उभे राहून दहशत माजविण्याचा प्रयत्न करणे, सोसायटीच्या आवारात विनापरवानगी त्यांची वाहने उभी करणे,  सायकल व दुचाकी चोरी तसेच सोसायटीमधील पार्किंगमधील वाहनांतून पेट्रोल चोरी करणे अशा घटना वाढू लागल्या असल्याकडे या शिष्टमंडळाने पोलिस निरीक्षक वाघमारे यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर या टवाळखोर टोळक्याचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी केली.

 दरम्यान,  बरलोटा नगरमध्य पोलिस गस्त वाढविली जाईल. आपण स्वत: सोसायटीत येऊन टवाळखोरांचा बंदोबस्त करु. तसेच छेडछडीला आळा घालण्याबरोबरच स्थानिक रहिवाशांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही  पोलीस निरीक्षक विजयकुमार वाघमारे यांनी दिल्याची माहिती एम.डी. चौधरी यांनी दिली.

Share

Leave a Reply