पुणे: टीम न्यू महाराष्ट्र
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत, असे पाकिस्तान आणि काँग्रेसला वाटते. विरोधी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे ‘मुंगेरीलाल’च अधिक आहेत, असा टोला शिवसेना नेते व राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. कट्टर शिवसैनिकांनी वाढविलेल्या पक्षाचा संजय राऊत यांनी सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवडच्या चिंचवडे लॉन्स येथे खान्देशवासीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार बारणे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे तसेच बाळासाहेब भागवत, कुणाल वाव्हळकर, श्रीधर वाल्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास शैलीत शेरोशायरी करीत विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला. ते म्हणाले की, मोदी पंतप्रधान होऊ नयेत, असे फक्त पाकिस्तानला आणि देशातील भ्रष्टाचाऱ्यांना वाटते. पण देशातील सर्वसामान्य जनतेला मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असे वाटते. त्यामुळे मोदींना दणादण मतदान करा, आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, ही मोदींची गॅरंटी आहे.
ज्यांच्याकडे 5-10 खासदारही नाहीत, ते इंडिया आघाडीतील नेतेही पंतप्रधान झाल्याचे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पहात आहेत, अशी खिल्ली गुलाबराव पाटील यांनी उडवली.
आम्ही रक्ताचं पाणी करून, जीवावर उदार होऊन पक्ष वाढवला, पण ते विनाकारण आम्हालाच बदनाम करीत आहेत. गद्दार, गद्दार म्हणून हिणवत आहेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. संजय राऊत यांनी पक्षाचा सत्यानाश केला, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसने कायम मतांचे राजकारण केले. भांडण लावून लोकांना येडं बनवलं. आता मोदींविषयी चुकीचे चित्र उभे करून मतदारांमध्ये भीती निर्माण करीत आहेत. पण हे आता चालणार नाही. मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेली देशाची प्रगती सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळे मोदी हेच पंतप्रधान होणार, हे खुद्द काँग्रेसवालेही मान्य करतात, असे ते म्हणाले.
श्रीरंग बारणे हे दिल्ली हलवून टाकणारे खासदार आहेत. विकास कामांसाठी त्यांनी राज्य शासनाकडे केलेला पाठपुरावा मी स्वतः पाहिला आहे. म्हणून त्यांच्यासाठी खान्देशवासीयांपुढे मतांची झोळी घेऊन आलो आहे, असे त्यांनी सांगितले. खान्देशातील मंडळी तुमच्या भरवशावर पिंपरी-चिंचवडमध्ये पोट भरण्यासाठी आली आहेत. त्यांना सुरक्षितपणे राहता आलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.