चिखली ः टीम न्यू महाराष्ट्र
आकर्षक रांगोळ्या…फुलांचा पुष्पवर्षाव…नवा गणवेश…नवे सवंगडी… बिस्कीट, चॉकलेट तसेच फुगे देऊन शिक्षकांकडून होणाऱ्या स्वागताने भारावलेले विद्यार्थी…अन् काही क्षणातच सुरु झालेला चिमुकल्यांचा किलबिलाट असे वातावरण चिखली, मोरेवस्ती येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या आवारात मंगळवारी (दि.१८)पहायला मिळाले.
सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे नवीन शैक्षणिक वर्षातील पूर्व प्राथमिक, प्राथमिकचा शाळाप्रवेशोत्सव आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांचे स्वागत अतिशय उत्साहात करण्यात आले. पहिल्यांदाच पालकांसह शाळेच्या आवारात आलेल्या काही लहानग्यांच्या चेहऱ्यावरील कुतूहल तर काहींचे रडवलेले चेहरे असे चित्र सुरुवातीला पहायला मिळाले. मात्र, शिक्षकांकडून पुष्प वर्षावात होणारे स्वागत आणि बिस्किटचा पु़डा आणि चॉकलेटचे गिफ्ट मिळताच लहानग्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून पालकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
सन २०२४-२५ च्या शाळा प्रवेशोत्सवासाठी सिद्धिविनायक स्कुलमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. शाळेचे प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. परिसराची साफसफाई करण्यात आली होती. नवागतांच्या हस्ते रिबिन कापून शाळा प्रवेशोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेत प्रवेश करताना नवागतांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर प्रत्येकाला बिस्किट आणि चॉकलेट देण्यात आले. त्यानंतर वर्गात गोष्टींची तसेच पाठ्यपुस्तके देण्यात आली. शाळेच्या संस्थापिका निर्मला जाधव, सचिव मारुती जाधव, प्राचार्या अश्विनी वाघ यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच सर्व सहशिक्षिका उपस्थित होत्या. निर्मला जाधव यांनी नवागतांना शाळेतील नियमांची माहिती समजावून सांगितली.