‘इंद्रायणी’ मालिका नव्या वळणावर

मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी बालकलाकार सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडत आहेत.’इंद्रायणी’ या मालिकेचं कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एकीकडे इंदू दिग्रसकर वाड्यात राहायला गेली असून तिथे ती प्रत्येक कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे इंदूच्या सतत पाठीशी असलेले तिचे लाडके व्यंकू महाराज यांची तब्येत बिघडत चालली असून इंदूला महाराजांची काळजी आहे.एका साधूबाबांनी सांगितल्याप्रमाणे इंदू व्यंकू महाराजांना वाचवण्याकरता मोठी कसोटी पार पाडेल. येत्या 10 जूनपासून इंदूचा नवीन प्रवास सुरू होणार. साधूबाबांनी इंदूला जी संजीवनी सांगितली होती, इंदू आता त्याच संजीवनीच्या शोधात आळंदीला जाण्याचं ठरवते.इंदूने निवडलेला हा प्रवास खूपच खडतर असणार यात काही शंका नाही. पैसे अपुरे असताना आणि कसली माहिती नसताना तिचा हा आळंदीचा प्रवास कसा होईल? तिच्या या खडतर प्रवासात पाठीराखा म्हणून साथ देणाऱ्या व्यक्तीची भूमिका संतोष जुवेकर साकारणार आहे.हे दोघं मिळून हा प्रवास कसा पार पाडणार आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. ‘इंद्रायणी’ या मालिकेतील इंदूची जबरदस्त इच्छाशक्ती आणि तिचा हा आळंदीचा खडतर प्रवास इंदूला व्यंकू महाराजांसाठी संजीवनी मिळवून देईल का? तिचं आराध्य दैवत असलेले श्री विठूमाऊली तिला कशी साथ देतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Share

Leave a Reply