कामगारांच्या प्रश्नांवर शेरसिंग डागोर यांचा घणाघात!
पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र
सफाई कामगारांच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी थेट पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासनाला जाब विचारला. आयुक्तांसह विभागप्रमुखांच्या उपस्थितीत सफाई कामगारांचे प्रश्न दाबले जाणार नाहीत, प्रशासनाने झोपेतून जागं व्हावं,. कामगारांच्या समस्या व अन्याय याकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्यावर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कामगारांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे वचन दिले.
या वेळी सफाई कामगारांच्या नाहक त्रासाबाबत वरिष्ठ नेते गणेश भोसले व संजयबापू जगदाळे यांनी सवालांची सरबत्ती करत प्रश्नांच्या फैरी सोडल्या. यावर डागोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना स्पष्ट शब्दांत सुनावले की समस्या दूर करा नाहीतर आयोगाचे दार उघडे आहे.
या वेळी झालेल्या बैठकीत पुढील विषयांवर चर्चा करण्यात आली.
● वारस नियुक्तीतील मनमानी थांबवा!
लाड-पागे समितीच्या नावाखाली वारस नियुक्त्या बिनधास्त चालू आहेत. पात्रतेचा विचार न करता मनमानी नेमणुका केल्या जात आहेत. हे थांबवाच!
● श्रमसाफल्य योजनेतील घरे… पण कागद कुठे?
निगडीतील सफाई कामगारांना घरे देऊनही आजपर्यंत कायदेशीर मालकीहक्काचे कागदपत्र नाहीत! घरं आहेत, पण हक्क नाही हा कुठचा न्याय?
● १०, २०, ३० वर्षांच्या लाभावर अन्यायकारक अटी!
सेवा प्रवेश नियम २०२० मधील शैक्षणिक आणि संगणकीय अटी म्हणजे केवळ छळ! जुन्या नियमांप्रमाणेच सवलती द्याव्यात!
● धन्वंतरी योजनेत भेदभावाचा विटाळ!
पैसा भरला तोच, पण सुविधा जनरल वॉर्डची? सफाई कामगारांसाठी सेमी-प्रायव्हेट रूम आणि जास्त हॉस्पिटल्सची गरज आहे!
आयुक्तांचं आश्वासन… पण काम कधी?
आयुक्त शेखर सिंह यांनी तोंडदेखलं आश्वासन दिलं – “समिती नेमतो आणि तातडीने उपाययोजना करतो.” मात्र, ही समितीही फाईलफोडी निघणार का?, असा सवाल कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.”
डागोर यांचा एल्गार!
“सफाई कामगार म्हणजे व्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष खपवून घेतलं जाणार नाही. प्रशासनाला कामगारांचा न्याय मिळवून द्यावा लागेलच, असा स्पष्ट इशारा शेरसिंग डागोर यांनी महापालिकेला दिला
लाड-पागे समितीच्या वारस हक्काच्या नियुक्त्यांसाठी कर्मचारी वर्गाला नाहक त्रास दिला जातो. त्या संदर्भातील नियुक्त्या, धन्वंतरी योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेमधील अनेक त्रुटी व त्या संदर्भातील तक्रारी यावेळी राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर आयुक्तांनी या संदर्भात पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येऊन कामगारांना न्याय देण्याचे काम केले जाईल., असे सांगितले आहे.
गणेश भोसले, एकता कर्मचारी संघटना.
१० , २० व ३० च्या लाभासाठी पूर्वी प्रमाणे शैक्षणिक नियमावली ठेवा. सफाई कामगारांना सेवा प्रवेश नियम २०२० नुसार वाढीव शैक्षणिक व संगणकीय अहर्ता, अटी व शर्थी लादल्या असून त्या कर्मचारी वर्गासाठी जाचक व अन्यायकारक असून नियमबाह्य आहेत. यामुळे कर्मचारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यासह अनेक कामगार हिताचे प्रश्न उपस्थित केले. यावर आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी सकारात्मक चर्चा करून यावर लवकर तोडगा काडण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
संजयबापू जगदाळे ः शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार कर्मचारी मंच.