‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून झाडाझडती
– म्युरल्सची तातडीने स्वच्छता न झाल्यास आंदोलनाचा इशारा
पिंपरी, टीम न्यू महाराष्ट्र
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “ई” क्षेत्रीय कार्यालयातील जगतगुरु संत तुकाराम महाराजांचे शिल्प धुळखात पडून आहे. हे म्युरल्स साफ करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याचे पाहून
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांनी ई क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चांगली झाडाझडती घेतली. हे म्युरल्स म्हणजे केवळ पुतळे नाही. तर आपली परंपरा, इतिहास सांगण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत असते. त्यांच्या बाबतचा हा अक्षम्य हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. तातडीने हे पुतळे स्वच्छ करण्यात यावे अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन केले जाईल असा इशारा युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिला.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “ई” क्षेत्रीय कार्यालयात असलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पाची (म्युरल्स) धूळ, जाळी जळमटे यामुळे दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले. याबाबतची माहिती देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख म्हणाले ई प्रभाग
कार्यालयात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा अक्षरशः कडेलोट झाला आहे.या कार्यालयात आपले महापुरुष, संत, महात्मे यांचे शिल्प (म्युरल्स) ठेवण्यात आलेली आहे. मात्र या शिल्पांवर प्रचंड धूळ साचली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळाले याबाबत
विचारणा केली असता हे म्युरल्स साफ करण्याची जबाबदारी ई प्रभागाने अक्षरश: क प्रभागावर ढकलून दिले. ‘ क ‘ प्रभागाने तर याबाबत कानावर हात ठेवत निष्काळजीपणाचा अक्षरशः कडेलोट केला आहे.यावरून लक्षात येते की महापालिकेला महापुरुष, संत, महात्मे यांचे स्मारक यांचा विसर पडला असल्याचे सिद्ध होते.
यावेळी युवकचे उपाध्यक्ष ओम क्षीरसागर, सरचिटणीस रजनीकांत गायकवाड,सचिव अश्रफ शेख,शहर सरचिटणीस शाहीद शेख,महेश यादव,तन्वीर अहमद आधी उपस्थित होते.
याबाबत क प्रभागाचे प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ई प्रभागाची प्रशासकीय इमारत ‘क’ प्रभागाच्या हद्दीत येते. याबाबत माहिती घेऊन त्या प्रकारे आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.