पुणे : टीम न्यू महाराष्ट्र
पुण्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात मुलगी वाचली आहे. या दुर्दैवी घटनेत आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १७) असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते मूळचे सोलापूर येथील राहणारे असून दापोडी येथे राहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भालेराव कुटुंबं हे दापोडी येथील अडसूळ यांच्या खोल्यांमध्ये राहत होते. या खोल्या पत्र्यांच्या आहेत. शेजारीच असलेल्या विजेच्या खांबाने त्याला धक्का बसला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास सुरेंद्र आंघोळीला गेले होते. टॉवेल टाकत असताना अचानक विजेच्या तारेचा धक्का बसला. त्यांच्या आवाजाने त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ मुलगा प्रसाद याने धाव घेतली. त्यालाही धक्का बसला त्याचवेळी पत्नी अदीका देखील त्या ठिकाणी आल्या. त्यांना देखील विजेचा धक्का बसला. चार जणांच्या या कुटुंबातील तीन व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे. कुटुंब प्रमुखासह दोघांचा जीव गेल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.