बारामती : टीम न्यू महाराष्ट्र
महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षा यासाठी कायदा हे एक प्रभावी आणि आवश्यक साधन आहे. महिलांच्या समस्या सोडवताना पोलीस प्रशासनासोबत आम्हाला कायदेतज्ज्ञांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे. समुपदेशन आणि मध्यस्थीच्या माध्यमातून अनेक कौटुंबिक प्रश्न तडजोडीतून मार्गी लागले आहेत. अॅड. सुप्रिया बर्गे यांचे महिलांच्या हक्कासाठी आणि जनजागृतीसाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे,” असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
अॅड. विशाल बर्गे आणि अॅड. सुप्रिया विशाल बर्गे यांनी बारामती येथे सुरू केलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन चाकणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या वेळी कार्यालयाचे अंतर्गत सजावट (इंटेरिअर डिझाईन) करणारे प्रकाश साबळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पुण्यातील नामांकित वकील सचिन झाल्टे पाटील यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी फौजदारी कायद्यात विशेष अनुभव असलेले ज्येष्ठ वकील विजयकुमार एस. बर्गे यांचीही उपस्थिती लाभली. विशाल बर्गे हे त्यांचे चिरंजीव असून सुप्रिया बर्गे या त्यांच्या सून आहेत.
विशाल बर्गे यांनी फौजदारी कायदा आणि मोटर अपघात कायद्यात विशेष प्राविण्य मिळवले आहे. तर सुप्रिया बर्गे या गेली बारा वर्षे ‘यशश्री फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून कायदेशीर जनजागृती, कौटुंबिक कायदे, महिला हक्क आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यात मदत झाली आहे.
या उद्घाटन सोहळ्याला बारामतीतील अनेक मान्यवर, विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘बर्गे अँड बर्गे असोसिएट्स’ हे कार्यालय बारामती आणि परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह व व्यावसायिक कायदेशीर सेवा पुरवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
