मुंबई :टीम न्यू महाराष्ट्र
गेल्या १० दिवसांपासून ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ केलेले उपोषण लक्ष्मण हाके यांनी स्थगित केले आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्री होते. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण स्थगित केले.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण छेडले होते. गेल्या १० दिवसांपासून ते उपोषणाला बसले आहेत. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडेंसह अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु, सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत दोन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारने पटवून दिल्याने उपोषण स्थगित करत असल्याची माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली.
आमच्या दोन मागण्या मंजूर केल्या आहेत. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश यायचा आहे, येण्याअगोदर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. बैठक झाल्याशिवाय सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे बोगस कुणबीच्या नोंदीवर आक्षेप घेतला होता. खोटी कुणबी प्रमाणपत्र देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई करू असं सरकारने सांगितलं आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं आहे की प्राधान्यक्रमाने प्रमाणपत्र ज्या सरकारने दिले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आता त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण त्यावर लाखो हरकती नोंदवल्या आहेत, त्या हरकतींची श्वेतपत्रिका मिळत नाही, तोवर हे आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. वरिष्ठ आणि संयोजन समितीच्या म्हणण्यावरून हे आंदोलन स्थगित केलं आहे.